
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरक्षित भूखंडांचे नाममात्र भाडेकरारावर वाटप करण्याचा सपाटा प्रशासनाने लावला असल्याचा आरोप करीत, ‘‘मनपा भवनावर ‘आरक्षित भूखंड भाडेतत्त्वावर देणे सुरू आहे’ असा फलक लावावा आणि ज्यांना त्याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी तातडीने अर्ज करावेत, असे आवाहनही आयुक्तांनी करावे,’’ अशी उपरोधिक टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख चेतन पवार यांनी केली.

महापालिका प्रशासन व शिक्षण विभागातील कथित भ्रष्टाचार आणि भोंगळ कारभाराविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने गुरुवारी ‘जागर मोर्चा’ काढला. मोर्चानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पवार यांनी विविध मुद्द्यांवर प्रशासनावर निशाणा साधला.
पुनावळे येथील महापालिका शाळेसाठी आरक्षित असलेला भूखंड खासगी संस्थेला देऊ नये, तर तेथे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मनपाने शाळा सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेने अनेकदा केली होती. आयुक्तांना निवेदने देऊन व पत्रकार परिषदांमधून विरोध दर्शवूनही सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत ९१ गुंठे क्षेत्रफळाचा हा आरक्षित भूखंड ३० वर्षांच्या मुदतीसाठी नाममात्र भाडेकरारावर देण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.

या विषयावर विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने सभागृहात ठाम भूमिका घ्यायला हवी होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपची ‘बी टीम’ असल्यामुळे त्यांनी विरोध केला नाही आणि बहुमताच्या जोरावर ठराव मंजूर करण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला. या निर्णयामागे कोणत्या लोकप्रतिनिधी अथवा वरिष्ठांचा दबाव होता, हे आयुक्तांनी जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली.

दापोडी येथील सर्व्हे क्रमांक १६ व १७ मधील क्रीडांगणाचे आरक्षण तातडीने विकसित करावे. अन्यथा तेही खासगी संस्थांच्या घशात घालण्याचा प्रयत्न होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच ताथवडे येथील जिल्हा परिषद शाळा महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे वर्ग करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, क्रीडा साहित्य, ग्रंथालय व प्रयोगशाळा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या गणवेश व शालेय साहित्याच्या खरेदी प्रक्रियेची फेरनिविदा काढावी, पवना व इंद्रायणी नद्यांचे प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच शहरातील सर्व नाल्यांची स्वच्छता तातडीने करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

ताथवडे येथे बांधकाम राडारोडा टाकण्यासाठी आरक्षित असलेल्या जागेवर कचरा टाकला जात असून त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. ही प्रकार तातडीने थांबवावा, असेही पवार म्हणाले. तसेच ताथवडे येथील सर्व्हे क्रमांक ६४/२/१ मधील नाला खासगी सल्लागाराचा अहवाल घेऊन वळविण्यात आल्याने नागरिकांना त्रास होत असल्याचा आरोप त्यांनी केला. हा निर्णय बिल्डरांच्या फायद्यासाठी घेण्यात आला असून संबंधित प्रकल्पाचा बांधकाम परवाना रद्द करावा, अशी स्थानिक नागरिकांची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि पोतराजाचा वेश परिधान करून काढण्यात आलेल्या या ‘जागर मोर्चा’त शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बापुराव चौधरी उपसंपादक