बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटन्सी (सीएमए) क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध होत असून विद्यार्थ्यांचा या अभ्यासक्रमाकडे कल झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस सीएमए करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याची माहिती इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे (आयसीएमएआय) राष्ट्रीय अध्यक्ष सीएमए टी.सी.ए. श्रीनिवासा प्रसाद यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या व सदस्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी संस्थेतर्फे स्वतंत्र हेल्पडेस्क सुरू करण्यात आला असून प्रशासकीय कामकाज अधिक सुसूत्र व सुलभ करण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

आयसीएमएआय पुणे चॅप्टरतर्फे कर्वेनगर येथील सीएमए भवनात आयोजित सत्कार व संवाद सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमास राष्ट्रीय उपाध्यक्ष सीएमए नीरज जोशी, केंद्रीय समिती सदस्य सीएमए नवनीत जैन, सीएमए आशिष थत्ते, पश्चिम विभागीय समितीचे सचिव सीएमए चैतन्य मोहरीर, उपाध्यक्ष सीएमए नॅन्टी शाह, पुणे चॅप्टरचे अध्यक्ष सीएमए श्रीकांत इप्पलपल्ली यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रसाद यांनी संस्थेच्या सक्षमीकरणासाठी नेतृत्व व सदस्य यांच्यातील सातत्यपूर्ण संवाद, ज्ञानविनिमय आणि कौशल्यवृद्धी महत्त्वाची असल्याचे सांगितले. स्वागतप्रास्ताविकात सीएमए श्रीकांत इप्पलपल्ली यांनी चॅप्टरतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांची माहिती दिली. सेमिनार, कार्यशाळा आणि विकास कार्यक्रमांमुळे संस्थेची ओळख अधिक बळकट होत असल्याचे त्यांनी सांगितले.

सीएमए नीरज जोशी यांनी मुख्यालय दिल्ली येथे स्थलांतरित झाल्यानंतर कामकाजाच्या गतीत वाढ झाल्याचे नमूद केले. यामुळे शासकीय यंत्रणांशी संपर्क अधिक जलद झाला आहे. सीएमए आशिष थत्ते यांनी सक्षम नेतृत्वामुळे प्रशासकीय नियंत्रण अधिक प्रभावी झाल्याचे सांगितले, तर सीएमए नवनीत जैन यांनी सहकारी व बँकिंग क्षेत्रातील घडामोडींवर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तर सत्र झाले. एआय विषयावर सीएमए देवदत्त केकतपुरे यांचे व्याख्यानही पार पडले. सूत्रसंचालन सीएमए तनुजा मंत्रवादी यांनी केले, तर आभार सीएमए हिमांशू दवे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *