बापुराव चौधरी, उपसंपादक
पुणे : समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यासाठी ‘प्राइड ऑफ इंडिया नॅशनल पुरस्कार २०२६’ या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवार, २८ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता हा सोहळा उत्साहात पार पडणार असून विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ आणि प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

या पुरस्कार सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे समाजाच्या विविध स्तरांवर भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय पातळीवर सन्मानित करण्यात येणार आहे. समाजसेवा, शिक्षण, कला, उद्योग, आरोग्य आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या मंचावरून गौरविण्यात येणार आहे. यामुळे त्यांच्या कार्याला अधिक व्यापक ओळख मिळणार असून नव्या पिढीला प्रेरणा मिळणार आहे.

यंदाच्या सोहळ्यात उरुळी कांचन येथील महानुभाव परंपरेतील महंत श्री गोपालव्यास कपाटे यांना ‘प्राइड ऑफ भारत इंडिया पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांच्या सामाजिक, धार्मिक तसेच लोकहिताच्या कार्याची दखल घेत हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी समाजात केलेल्या निस्वार्थ कार्यामुळे त्यांना हा सन्मान मिळत असल्याने त्यांच्या अनुयायांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पुरस्कारप्राप्त मान्यवरांना सन्मानचिन्ह, पदक, प्रमाणपत्र आणि मानाचा फेटा देऊन गौरविण्यात येणार आहे. या माध्यमातून त्यांच्या कार्याची दखल घेत समाजात सकारात्मक संदेश देण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. समाजात चांगले कार्य करणाऱ्यांना योग्य व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.
हा भव्य सोहळा कॉनराड ट्री हॉटेल येथे पार पडणार असून कार्यक्रमासाठी सर्व सोयीसुविधांनी युक्त असे भव्य नियोजन करण्यात आले आहे. मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित राहणार असल्याने या सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
समाजातील प्रेरणादायी व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.