पुणे : शहरातील सुखसागर परिसरात गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या जडाबाई दुगड शिक्षण संकुलात नव्याने उभारण्यात आलेल्या संगणक कक्ष व ग्रंथालयाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. लेडीज सर्कल इंडिया यांच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती शीशम सबरवाल व क्षेत्र अध्यक्षा श्रीमती मेघा राठी यांच्या हस्ते या अत्याधुनिक सुविधांचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गौरव दुगड व मोनल दुगड उपस्थित होते. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका नंदा राजाराम भोसले, पुणे कॉस्मोपोलिटन राऊंड टेबल ११० चे अध्यक्ष अश्विन संघवी, पुणे कॉस्मोपोलिटन लेडीज सर्कल ८१ च्या अध्यक्षा सुमन पोरवाल, सचिव वीनीता खाटर, कोषाध्यक्ष विनिता ओसवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना संस्थेच्या सचिव मोनल दुगड यांनी सांगितले की, “सुमारे ४० वर्षांपूर्वी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली ही शाळा आज मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहे. येथे सेमी-इंग्लिश माध्यम सुरू करण्यात आले असून कमी शुल्कात दर्जेदार शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आता लायब्ररी आणि संगणक लॅबची भर घालण्यात आली आहे.”

ही संस्था कै. माणिकचंद नारायणदास दुगड यांनी सुरू केली असून सध्या प्रमोद माणिकचंद दुगड हे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. गौरव दुगड उपाध्यक्ष तर मोनल दुगड सचिव म्हणून कार्य पाहत आहेत. संस्थेमार्फत सुखसागर परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत.
यावेळी शीशम सबरवाल यांनी संयुक्त प्रयत्नांचे कौतुक करत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. तंत्रज्ञान व पुस्तकांची उपलब्धता ही संधीतील तफावत कमी करण्यास कशी मदत करते यावर त्यांनी प्रकाश टाकला. नव्याने उभारण्यात आलेला संगणक कक्ष विद्यार्थ्यांना आवश्यक डिजिटल कौशल्ये विकसित करण्यास मदत करेल, तर ग्रंथालयामुळे वाचनाची सवय व आजीवन शिक्षणाची वृत्ती जोपासली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
दीर्घकालीन सकारात्मक परिणाम घडवणाऱ्या सामाजिक कार्यात योगदान देताना दोन्ही संस्थांच्या सदस्यांनी अभिमान व्यक्त केला. खरे सक्षमीकरण हे शिक्षणासोबत स्वावलंबनाच्या संधी निर्माण केल्यानेच साध्य होते, या विश्वासाचा त्यांनी पुनरुच्चार केला.
या उपक्रमासाठी पुणे कॉस्मोपोलिटन राऊंड टेबल ११० व पुणे कॉस्मोपोलिटन लेडीज सर्कल ८१ यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच मोहित गलानी, भावना गलानी, पूर्वा संघवी, प्रीती कटारिया आदी मान्यवर उपस्थित होते.