सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : लक्ष्मी रोड परिसरातील शगुन चौक येथे गुलाबो गॅंग व बिटिया फाउंडेशनच्या वतीने केंद्रातील मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात शुक्रवारी उपहासात्मक आंदोलन करण्यात आले. “झालमोरी बेचो, सोना मत बेचो” अशी अनोखी घोषणा देत कार्यकर्त्यांनी सरकारच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला.

मोदी सरकारने नागरिकांना पुढील एक वर्ष सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन केल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी शगुन चौक परिसरातील विविध सराफी दुकानांना भेट देत दुकानदारांना प्रतीकात्मक स्वरूपात “झालमोरी विकण्याचा” सल्ला दिला.
महिलांनी हातात झालमोरी घेऊन नागरिक तसेच दुकानदारांना त्याचे वाटप केले. यावेळी सरकारच्या आर्थिक धोरणांवर उपरोधिक पद्धतीने टीका करण्यात आली. अष्टेकर सराफचे सचिन अष्टेकर हे देखील यावेळी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी त्यांनाही झालमोरी देत प्रतीकात्मकरीत्या “झालमोरी विकण्याचे” आवाहन केले.
या आंदोलनाचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी यांनी केले होते. कार्यक्रमास गुलाबो गॅंग व बिटिया फाउंडेशनच्या महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. त्यामध्ये शोभा पणीकर, भारतीय लोंढे, कीर्ती जाधव आणि पारुल ताई यांचा समावेश होता.
वाढती महागाई, सामान्य नागरिकांवरील आर्थिक ताण तसेच सरकारी धोरणांतील सततच्या बदलांमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
बापुराव चौधरी उपसंपादक