पुणे : उरुळी कांचन परिसरात मध्यरात्री संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन इसमांवर पोलिसांनी कारवाई करत एकास अटक केली असून दुसरा फरार झाला आहे. आरोपींकडून घरफोडीसाठी वापरली जाणारी हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.

उरुळी कांचन पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ६४/२०२६ नुसार, पोलिस कॉन्स्टेबल शरद भानुदास चव्हाण (बकल नं. २८८४) यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली.
२० मार्च रोजी रात्री ११ ते २१ मार्च पहाटे ५ वाजेपर्यंत पेट्रोलिंगदरम्यान तुपेवस्ती रोडवरील साखरे पेट्रोलपंप व सदानंद बेकरीच्या पाठीमागे दोन इसम अंधारात संशयास्पदरीत्या थांबलेले दिसून आले.

पोलिसांनी त्यांच्याकडे जाताच दोघांनी दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पाठलाग करून विशाल कैलास साबळे (वय २९, रा. तुपेवस्ती, उरुळीकांचन) याला ताब्यात घेण्यात आले, तर त्याचा साथीदार सनी अगरवाल अंधाराचा फायदा घेत फरार झाला.
अटक आरोपीकडून लोखंडी कटावणी (सुमारे दीड फूट), धारदार स्क्रू ड्रायव्हर आणि चेहरा झाकण्यासाठी वापरलेला काळा रुमाल जप्त करण्यात आला. तसेच नंबर प्लेट नसलेली गोल्डन रंगाची अॅक्टिव्हा दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
सदर इसम रात्रीच्या वेळी चेहरा लपवून घरफोडी किंवा चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचा संशय असल्याने महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार चोरमले करीत असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.