बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : सोमेश्वर फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने शहरातील हौशी गायक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘पुणे आयडॉल २०२६’ या गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ४ मे ते १० मे २०२६ या कालावधीत होणार असल्याची माहिती नगरसेवक चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी फाउंडेशनचे विश्वस्त बिपीन मोदी, जितेंद्र भुरुक, उमेश वाघ, अमित मुरकुटे, महेंद्र पवार, गणेश शेलार, संजय माझिरे, संजय तरडे आणि प्रमोद कांबळे उपस्थित होते. स्व. विनायक निम्हण यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या स्पर्धेने केवळ व्यासपीठ न राहता गायक कलाकारांसाठी मानाचे स्थान निर्माण केले आहे.

या उपक्रमातून अनेक नवोदितांना संधी मिळाली असून, नामवंत संगीत क्षेत्रातील व्यक्ती परीक्षक म्हणून सहभागी होत असल्याने स्पर्धेची प्रतिष्ठा वाढली आहे.

स्पर्धा चार वयोगटांत होणार आहे. त्यामध्ये ‘लिटिल चॅम्प्स’ (१५ वर्षांपर्यंत), ‘युवा आयडॉल’ (१६ ते २५ वर्षे), ‘जनरल आयडॉल’ (२६ ते ५८ वर्षे) आणि ‘ओल्ड इज गोल्ड’ (५८ वर्षांवरील) यांचा समावेश आहे. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या गायकांनाही यात सहभागी होता येणार आहे.

विजेत्यांना अनुक्रमे १५ हजार, १० हजार आणि ५ हजार रुपयांची रोख पारितोषिके तसेच ‘पुणे आयडॉल’ सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. उत्कृष्ट स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षिसेही दिली जाणार आहेत. याशिवाय, उल्लेखनीय कार्य करत गायनाची आवड जोपासणाऱ्या पाच जणांना ‘व्हॉईस ऑफ चॉईस – पुणे आयडॉल’ पुरस्काराने गौरविण्यात येईल.

स्पर्धेचे उद्घाटन उपेंद्र भट यांच्या हस्ते ४ मे रोजी सकाळी ९.३० वाजता पं. भीमसेन जोशी सभागृह येथे होणार आहे. अंतिम फेरी १० मे रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडेल. इच्छुकांनी १ मेपर्यंत संकेतस्थळावर नोंदणी करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *