
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
उरुळी कांचन: दिवाळीच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधत पेठ गावचे आदर्श सरपंच सूरज भालचंद्र चौधरी यांच्या पुढाकारातून पत्रकार बांधवांसाठी विशेष स्नेहभेटीचे आयोजन करण्यात आले होते. सण-उत्सव हे केवळ आनंदोत्सव नसून माणसामाणसांतील नात्यांना आपुलकीचा उजाळा देणारे पर्व असते. याच भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहमेळाव्यात संवाद, सद्भावना आणि परस्पर सन्मानाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

दिवाळीच्या निमित्ताने आयोजित या स्नेहभेटीत उपस्थित पत्रकार बांधवांचे स्वागत करून त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधण्यात आला. सामाजिक, राजकीय तसेच ग्रामीण भागातील विविध विकासकामांच्या अनुषंगाने यावेळी चर्चा रंगली. पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असताना येणाऱ्या अडचणी, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, ग्रामीण भागातील समस्या आणि लोकशाही व्यवस्थेत पत्रकारितेचे महत्त्वपूर्ण स्थान अशा विविध विषयांवर विचारांची देवाणघेवाण झाली.

समाजातील घडामोडींना शब्दरूप देत सामान्य जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करीत असतात. ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न, नागरिकांच्या समस्या आणि विकासाच्या अपेक्षांना वाचा फोडण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून सातत्याने केले जाते. त्यामुळे पत्रकारांच्या कार्याचा सन्मान करणे आणि त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध जोपासणे ही सामाजिक बांधिलकी असल्याची भावना या उपक्रमातून व्यक्त झाली.

सामाजिक विकासाच्या वाटचालीत लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि पत्रकारिता या तिन्ही घटकांमध्ये सुसंवाद असणे आवश्यक आहे. सकारात्मक कामांना प्रोत्साहन मिळावे, समाजहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जावेत आणि परस्परांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ व्हावे, या उद्देशाने या स्नेहभेटीचे आयोजन करण्यात आले होते. केवळ दिवाळीच्या शुभेच्छांची औपचारिकता न ठेवता आपुलकीच्या संवादातून नाती अधिक घट्ट करणारा हा उपक्रम उपस्थित पत्रकारांसाठी आनंददायी ठरला. सरपंच सूरज चौधरी यांच्या या स्तुत्य पुढाकाराचे उपस्थितांनी कौतुक केले.

यावेळी कोरेगाव मूळचे माजी उपसरपंच लोकेश कानकाटे, सोरतापवाडी व पेठचे पोलीस पाटील दत्तात्रय चौधरी, पत्रकार सचिन सुंबे, शरद पुजारी, अमोल भोसले, सुवर्णा कांचन, चंद्रकांत दुंडे, अमोल आढागळे, बापू धुमाळ, बापूसाहेब चौधरी, भाऊसाहेब महाडिक, सुभाष कड, गजानन जगताप, दिनेश कदम, अमोल महाडिक आदी उपस्थित होते.
बापुराव चौधरी उपसंपादक