पिंपरी-चिंचवड : जन्मतः कर्णबधिर असलेल्या दोन चिमुकल्या मुलींना ऐकण्याची आणि बोलण्याची नवी संधी देत चिंचवड येथील मोरया रुग्णालयाने वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे. रुग्णालयातील कान-नाक-घसा शल्य चिकित्सक डॉ. अक्षय वाचासुंदर यांनी इंदू आणि गीत या दोन्ही मुलींवर यशस्वी कॉक्लियर इंप्लान्ट शस्त्रक्रिया करून त्यांना नवजीवन दिले.

यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. अक्षय वाचासुंदर यांनी माहिती देताना सांगितले की, देहूरस्ता येथील मल्लेश कानडे यांच्या दोन्ही मुली जन्मतः ऐकू येत नसल्याने कुटुंबावर मोठा मानसिक आघात झाला होता. मोठी मुलगी इंदू आणि नंतर जन्मलेली गीत या दोघीही कर्णबधिर असल्याचे निदान झाल्यानंतर त्यांच्या उपचारांचा प्रश्न गंभीर बनला होता. मात्र, योग्य वेळी निदान आणि उपचारांची जोड मिळाल्यामुळे या दोन्ही मुलींना ऐकण्याची क्षमता प्राप्त झाली आहे.

गीत हिची शस्त्रक्रिया राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत करण्यात आली, तर इंदूची शस्त्रक्रिया मुख्यमंत्री सहायता निधी तसेच मोरया रुग्णालयाच्या माध्यमातून जमवलेल्या देणग्यांमधून पूर्ण करण्यात आली. विशेष म्हणजे या दोन्ही शस्त्रक्रियांसाठी मुलींच्या पालकांना कोणताही खर्च करावा लागला नाही.

शस्त्रक्रियेनंतर इंदू आणि गीत यांनी प्रथमच आई-वडिलांची हाक ऐकली, हा क्षण कुटुंबासाठी अत्यंत भावनिक आणि अविस्मरणीय ठरला. डॉ. वाचासुंदर यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांमुळे कर्णबधिर मुलांना मुख्य प्रवाहात आणणे शक्य होते.

सध्या दोन्ही मुली यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात ‘कोक्लिया पुणे’ मार्फत चालविण्यात येणाऱ्या स्पीच थेरपी सेंटरमध्ये मोफत स्पीच थेरपी घेत आहेत.

पत्रकार परिषदेस मोरया रुग्णालयाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अविनाश वाचासुंदर तसेच शस्त्रक्रिया झालेल्या मुलींचे पालक उपस्थित होते.

यावेळी मल्लेश कानडे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “दोन्ही मुलींच्या शस्त्रक्रियेचा मोठा आर्थिक प्रश्न आमच्यासमोर होता. मात्र आरबीएसके, मुख्यमंत्री सहायता निधी, मोरया हॉस्पिटल व कोक्लिया पुणे या सगळ्यांमुळे हा उपचार शक्य झाला. आता मुलींना ऐकू येऊ लागले आहे, हा आमच्यासाठी नवजीवनाचा आनंद आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *