पुणे : शिक्षक नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त होत असले, तरी त्यांच्या ज्ञानदानाच्या अखंड ज्योतीला कधीही विराम मिळता कामा नये; उलट उर्वरित आयुष्यही त्यांनी ‘शिक्षक’ या पवित्र भूमिकेतूनच जगावे, असे भावपूर्ण आवाहन आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदरचे अध्यक्ष विजय कोलते यांनी केले.

अष्टापूर येथील न्यू इंग्लिश स्कूलचे आदर्श मुख्याध्यापक सुभाष बाबुराव काळे यांच्या प्रदीर्घ व प्रेरणादायी शैक्षणिक सेवेनंतर आयोजित सेवानिवृत्ती गौरव सोहळ्यात ते बोलत होते. विद्यालयाच्या हिरवळीने नटलेल्या आवारात ३० मार्च रोजी हा सोहळा उत्साह, आदर आणि कृतज्ञतेच्या वातावरणात संपन्न झाला.

अध्यक्षस्थानावरून बोलताना कोलते यांनी सुभाष काळे यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली अष्टापूर परिसरातील शैक्षणिक विकासाला नवी दिशा मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनातून घडलेले अनेक विद्यार्थी आज यशाच्या शिखरावर आरूढ झाले आहेत, हीच त्यांच्या कार्याची खरी पावती आहे.
यावेळी श्रीहरी कोतवाल, नंदकुमार सागर, नितीन मेमाणे, माजी मुख्याध्यापक रामदास जगताप, सचिन कोतवाल, ऐश्वर्या मांगडे आणि विद्यार्थिनी श्रावणी निकाळजे यांनी आपल्या मनोगतातून काळे सरांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव केला.

सत्काराला उत्तर देताना सुभाष काळे यांनी संस्थेप्रती, सहकाऱ्यांप्रती, कुटुंबीय, पालक व विद्यार्थ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत, “शिक्षणसेवा हीच माझी खरी ओळख असून ती पुढेही कायम ठेवण्याचा प्रयत्न करेन,” अशी भावनिक प्रतिक्रिया दिली.

या प्रसंगी गीतांजली काळे, सत्यभामा काळे, नवनीत काळे, मनोज काळे, उद्योजक राजेश कोतवाल, राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक नंदकुमार सागर, तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, आजी-माजी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब ढवळे यांनी प्रभावीपणे केले, तर चौरंगनाथ कामथे यांनी आभार प्रदर्शन करून सोहळ्याची सांगता केली.

अशा या भावस्पर्शी सोहळ्यातून ‘शिक्षकत्व’ ही केवळ नोकरी नसून आयुष्यभराची साधना आहे, हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *