बापुराव चौधरी ,उपसंपादक

पुणे – चंदननगर पोलीस स्टेशन येथील दोन पोलीस अंमलदारांनी प्रसंगावधान आणि तत्परता दाखवत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवले. या धाडसी आणि मानवतावादी कामगिरीबद्दल त्यांचा पोलीस स्टेशनमध्ये सत्कार करण्यात आला.

दि. २७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास महात्मा फुले मार्शल पथकातील पोलीस अंमलदार २८१७ तलवारे व पोलीस अंमलदार ७७९ सतीश कतारी हे दिवसपाळीच्या कर्तव्यावर असताना एमडीटी मशीनवर CFS क्रमांक ३६२३०८५० द्वारे आत्महत्येच्या प्रयत्नाबाबत कॉल प्राप्त झाला.

सदर कॉल मिळताच दोन्ही अंमलदारांनी तत्काळ कॉलरशी संपर्क साधला. कॉलरने दिलेल्या माहितीनुसार त्याचे वडील घराचा दरवाजा आतून बंद करून आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याचे समजले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मार्शल पथक तातडीने दिलेल्या पत्त्यावर दाखल झाले.

घटनास्थळी पोहोचताच दरवाजा बंद असल्याने त्यांनी तत्काळ वेल्डरला बोलावून दरवाजा उघडून घेतला. आत प्रवेश केल्यावर संबंधित व्यक्ती गळफास घेण्याच्या प्रयत्नात दिसून आली. वेळ न दवडता दोन्ही अंमलदारांनी त्यांना खाली उतरवून सुरक्षितरीत्या बेडवर बसवले,

यानंतर त्यांनी संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर संबंधित व्यक्तीला पोलीस स्टेशनमध्ये आणून त्यांना समुपदेशन करण्यात आले, व कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले.

या संपूर्ण घटनेत दाखवलेल्या धाडस, सतर्कता आणि संवेदनशीलतेबद्दल पोलीस अंमलदार तलवारे व कतारी यांचा चंदननगर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख व पोलीस निरीक्षक गुन्हे अमोल धस यांच्या हस्ते हजेरीदरम्यान सत्कार करण्यात आला. त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *