सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘वननेस वन – निसर्गाशी समरसता’ अभियानाच्या सहाव्या टप्प्यांतर्गत रविवारी देशभरातील ६५० ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या अभियानात लाखो श्रद्धाळू व स्वयंसेवकांनी सहभाग घेत सुमारे ५.५ लाख रोपांची लागवड केली.

सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या आशीर्वादाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला बाबा हरदेव सिंह जी यांच्या ‘प्रदूषण आत असो वा बाहेर, दोन्ही हानिकारक आहे’ या संदेशाची प्रेरणा आहे. पर्यावरण संवर्धनासोबतच निसर्गाप्रती जबाबदारीची भावना निर्माण करणे हा अभियानाचा उद्देश आहे.


पुणे झोन क्रमांक ३४ अंतर्गत भवरापूर, कोरेगाव मुळ, खुटबाव, पाषाण (सुतारवाडी) आणि पिंपळगाव-खडकी येथे अभियान राबविण्यात आले. या ठिकाणी एकूण १० हजार ३०० रोपांची लागवड करण्यात आली. यामध्ये हजाराहून अधिक सेवादल व साधसंगत सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. झोनल इंचार्ज अशोक आहुजा आणि क्षेत्रीय संचालक अवनित तवरे उपस्थित होते.

पिंपळगाव-खडकी येथे यंदा नवीन ‘वननेस वन’ स्थळाची भर पडली. सुमारे १ लाख ५२ हजार ४६० चौरस फूट क्षेत्रात पाच हजार रोपांची लागवड करण्यात आली. भवरापूर येथेही पाच हजार रोपांची लागवड करण्यात आली.

पुणे झोनमध्ये मागील वर्षांत लावण्यात आलेल्या ४२ हजार ७८५ वृक्षांचे संगोपन व देखभाल सेवादारांकडून नियमितपणे केली जात आहे. या रोपांची जीवितता शंभर टक्के असल्याचे सांगण्यात आले. देहूगाव येथील लागवड पूर्ण झाली असून तेथे सध्या केवळ देखभालीचे काम सुरू आहे.

संत निरंकारी मंडळाचे सचिव जोगिंदर सुखीजा यांनी सांगितले की, ऑगस्ट २०२१ मध्ये सुरू झालेले ‘वननेस वन’ अभियान आता देशव्यापी जनआंदोलन बनले आहे. वृक्षारोपणाबरोबरच लावलेल्या रोपांची तीन ते पाच वर्षे नियमित देखभाल करण्यावर भर दिला जात आहे. भविष्यात सघन लघुवने निर्माण होऊन जैवविविधता आणि स्थानिक परिसंस्थेला बळकटी मिळण्यास यामुळे मदत होणार आहे.

अभियानाच्या समारोपावेळी उपस्थितांनी लावलेल्या रोपांचे वृक्ष होईपर्यंत संरक्षण करण्याचा संकल्प केला. पर्यावरण संवर्धन ही केवळ आजची गरज नसून भावी पिढ्यांप्रती आपली सामूहिक जबाबदारी आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *