सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC), सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार यांच्या क्षमता निर्माण कार्यक्रमांतर्गत ‘भारत में मीठी क्रांती’ या उपक्रमाच्या माध्यमातून उरुळी कांचन येथे मधमाशी पालन विषयावरील एकदिवसीय जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.

महात्मा गांधी विद्यालयासमोरील जिजाऊ सभागृहात आयोजित कार्यक्रमात मधमाशी पालनाचे आर्थिक, पर्यावरणीय तसेच कृषी क्षेत्रातील महत्त्व याविषयी प्रशिक्षण अधिकारी राहुल काळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास शेतकरी, युवक, महिला बचतगटांच्या सदस्यांसह मधमाशी पालन व्यवसायात इच्छुक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे आणि अनिल बहुउद्देशीय सामाजिक संस्था, उरुळी कांचन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विकास जगताप यांनी मध उत्पादन, मधमाश्यांमुळे होणारे परागीभवन, त्यातून पिकांच्या उत्पादनात होणारी वाढ, रोजगारनिर्मितीच्या संधी तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली.

संस्थेचे अध्यक्ष अनिल रामू कदम यांनी मधमाशी पालन हा ग्रामीण भागातील शेतकरी, युवक आणि महिलांसाठी शाश्वत उत्पन्नाचा प्रभावी पर्याय असल्याचे सांगितले. अधिकाधिक युवकांनी या व्यवसायाकडे वळून रोजगारनिर्मितीला चालना द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास राहुल काळे, शिबिर प्रशिक्षण खादी ग्राम अधिकारी महंत श्री. गोपाल व्यास कपाटे, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश व्यापार आघाडीचे अध्यक्ष विकास जगताप, महात्मा गांधी विद्यालयाचे माजी प्राचार्य देविदास टिळेकर, कृषी अधिकारी राजेंद्र भोसेकर, पोपट ताम्हाने, शरद महाडिक, आदित्य लोंढे, उमेश म्हेत्रे, नितीन गायकवाड, आनंद कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनील तुपे यांनी केले, तर आभार अनिल कदम यांनी मानले.

मधमाशी पालनाच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसाय, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात, याबाबत कार्यक्रमातून उपस्थितांमध्ये सकारात्मक जनजागृती झाली.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *