बापुराव चौधरी, उपसंपादक
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘पीएम व्हिजन टू आर्ट’ या राष्ट्रीय पोस्टर डिझाइन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळा प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे उत्साहात पार पडला. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते ७५ विजेत्यांचा गौरव करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी सांस्कृतिक विभागाचे सचिव किरण कुलकर्णी आणि दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती म्हसे पाटील उपस्थित होत्या. तसेच स्पर्धेवरील कॉफी टेबल बुकचे अनावरण करण्यात आले.

यावेळी बोलताना मंत्री शेलार यांनी देशातील युवकांच्या सर्जनशीलतेचे कौतुक केले. “भारताची सॉफ्ट पॉवर ही आपल्या कला आणि कल्पकतेत आहे. या प्रदर्शनातून त्याचा प्रत्यय येतो,” असे ते म्हणाले. पंतप्रधानांचे जीवन देशासाठी समर्पित असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या कार्याचा उल्लेख केला. तसेच या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीही जपली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
या स्पर्धेला देशभरातून सुमारे तीन हजार नोंदी प्राप्त झाल्या होत्या. विविध वयोगटांतील कलाकार, डिझायनर आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पद्मश्री पुरस्कार विजेते आणि नामवंत तज्ज्ञांच्या परीक्षक मंडळाने अंतिम ७५ विजेत्यांची निवड केली.
‘विकसित भारत’ संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी आत्मनिर्भर भारत, डिजिटल इंडिया, स्वच्छ भारत, मेक इन इंडिया, स्किल इंडिया यांसारख्या नऊ विषयांवर ही स्पर्धा घेण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या शेवटी स्वाती म्हसे पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.