बापुराव चौधरी, उपसंपादक
पुणे : सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (SSPU) तर्फे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात असून ‘जेंडर इन्क्लुजन आणि स्किल डेव्हलपमेंट’ या विषयावरील आशियातील पहिले युनेस्को चेअर उद्या (२४ एप्रिल) सुरू होत आहे.

युनेस्को, पॅरिसच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत असून SSPU कॅम्पस, किवळे येथे “विमेन लीडिंग द फ्युचर ऑफ वर्क” या आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान त्याचे उद्घाटन होणार आहे.

केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जयंत चौधरी यांच्या हस्ते या चेअरचे उद्घाटन होईल. कार्यक्रमास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे तसेच नॉर्वेच्या कॉन्स्युल जनरल मोनिका नागेलगाड उपस्थित राहणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञही परिषदेत सहभागी होणार असून कौशल्य विकासातील नव्या संधींवर चर्चा होईल.

या उपक्रमाचे नेतृत्व SSPU च्या प्रो-चान्सलर डॉ. स्वाती मुजुमदार करत असून त्या युनेस्को चेअरहोल्डर म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. STEM क्षेत्रातील कौशल्य विकासाद्वारे महिलांचा सहभाग वाढवणे, रोजगारक्षमतेला चालना देणे आणि सर्वसमावेशक शिक्षण प्रणाली विकसित करणे हे या चेअरचे उद्दिष्ट आहे.
ही चेअर कौशल्य-आधारित शिक्षणाला बळकटी देत ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून कार्य करणार आहे. विशेषतः एआय, सेमीकंडक्टर आणि डिफेन्स टेक्नॉलॉजीसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांत महिलांना संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. ‘कुशल साथी’सारख्या उपक्रमांद्वारे गरजू मुलींना शिक्षणाबरोबरच औद्योगिक अनुभव देण्याची संधी मिळणार आहे.
SSPU हे राज्यातील पहिले कौशल्य विद्यापीठ असून NIRF क्रमवारीत सलग दोन वर्षे प्रथम क्रमांक पटकावला आहे. या नव्या उपक्रमामुळे भारत जागतिक कौशल्य विकासाच्या क्षेत्रात अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.