बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : राज्यातील मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत जिल्ह्यात १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या ९ हजार ४८२ मुलींना गेल्या तीन वर्षांत एकूण ४ कोटी ७४ लाख १० हजार रुपयांचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.

पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत पहिल्या हप्त्यात प्रतिलाभार्थी ५ हजार रुपये दिले जातात. सन २०२३-२४ मध्ये १ हजार ४० मुलींना ७० लाख रुपये, सन २०२४-२५ मध्ये ५ हजार ७२० मुलींना २ कोटी ८६ लाख रुपये, तर सन २०२५-२६ मध्ये २ हजार ३६२ मुलींना १ कोटी १८ लाख १० हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

मुलींच्या जन्मदरात वाढ करणे, शिक्षणाला चालना देणे, बालमृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे, कुपोषणाचे प्रमाण घटवणे आणि शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणणे, या उद्देशाने ‘लेक लाडकी’ योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेसाठी लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असावे आणि बँक खाते असणे बंधनकारक आहे. ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांतील १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या एक किंवा दोन मुलींना लागू आहे. एक मुलगा व एक मुलगी असल्यासही मुलीला या योजनेचा लाभ मिळतो.

योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत ६ हजार, सातवीत ७ हजार, अकरावीत ८ हजार आणि १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये असे एकूण १ लाख १ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *