बापुराव चौधरी, उपसंपादक

पिंपरी : पदाची अपेक्षा न ठेवता समाजासाठी सातत्याने कार्य करणारे आणि कार्यकर्त्यांना बळ देणारे सचिन साठे हे उपक्रमशील व्यक्तिमत्त्व आहे, असे मत पुणे शिक्षण मंडळाचे माजी सचिव जयसिंग डुंबरे यांनी व्यक्त केले.

त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून कार्य करणारे स्वर्गीय सुनील बबन साठे हे समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारे कार्यकर्ते होते, असेही त्यांनी सांगितले.

अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सचिन साठे सोशल फाउंडेशनतर्फे पिंपळे निलख, विशालनगर येथे स्वर्गीय सुनील बबन साठे यांच्या स्मरणार्थ “सामाजिक कृतज्ञता पुरस्कार” वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीचा पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते सुभाष धोंडीराम इंगळे यांना प्रदान करण्यात आला.

स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि ११,५०१ रुपयांची रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी सचिन साठे, नगरसेविका स्नेहाताई कलाटे, भुलेश्वर नांदगडे, काळुराम नांदगुडे, निवृत्त डीसीपी नरेंद्र गायकवाड, रंगनाथ थोपटे, संजय केदारी, अनंत कुंभार, अशोक मेंगळे, अशोक बनसोडे, राजाभाऊ मासूळकर, संभाजीराव इंगवले आदी मान्यवर उपस्थित होते.

सचिन साठे यांनी सांगितले की, कोरोनाकाळातही सुनील साठे यांनी विशालनगरमधील विविध समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. समाजासाठी निस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी हा पुरस्कार देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

स्नेहाताई कलाटे म्हणाल्या की, समाजाशी नाळ जुळवून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान होणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे समाजातील योगदानाची जाणीव अधोरेखित होते.

सुभाष इंगळे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना, सुनील साठे यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजकार्य सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाचे स्वागत नितीन पाटील यांनी, प्रास्ताविक सचिन साठे यांनी तर आभार भरत इंगवले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *