पुणे : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत असलेल्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा सुधारित कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या घोषणेमुळे ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना पुन्हा एकदा वेग आला असून, आगामी काही दिवसांत प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात होण्याची चिन्हे दिसत आहेत.

राज्य निवडणूक आयोगाचे पत्र क्रमांक रानिआ/जिपर्पस-२०२५/प्र.क्र.४८/का.७, दिनांक २९ जानेवारी २०२६ अन्वये हा सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, जिल्हाधिकारी स्तरावरून निवडणूक प्रक्रियेची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, निवडणूक कामकाजाच्या तयारीला गती देण्यात आली आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार, निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना शनिवार, दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर शनिवार, दि. ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानानंतर अवघ्या दोन दिवसांत, सोमवार, दि. ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे.

निवडून आलेल्या सदस्यांची अधिकृत नावे बुधवार, दि. ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत शासन राजपत्रात प्रसिद्ध करण् यात येणार असल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे. संपूर्ण निवडणूक कार्यक्रम हा मा. राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आला आहे.

दरम्यान, निवडणूक तारखा जाहीर होताच विविध राजकीय पक्ष, आघाड्या व इच्छुक उमेदवारांनी हालचाली वाढवल्या असून, गावागावांत बैठका, संपर्क मोहीम आणि प्रचाराचे नियोजन सुरू झाले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांकडे ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण म्हणून पाहिले जात असून, या निवडणुकांचे निकाल आगामी स्थानिक राजकारणाची दिशा ठरवणारे ठरणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *