चंदननगर पोलिसांची जलद कारवाई, गुन्हे शाखेच्या मदतीने आरोपी जेरबंद
उपसंपादक – बापुराव चौधरी
चंदननगर परिसरात महिलेच्या खूनप्रकरणी पोलिसांनी अवघ्या सहा तासांत तिन्ही आरोपींना जेरबंद केले. या प्रकरणात ॲड. संजय दत्तात्रय सावंत, त्यांची पत्नी स्वाती संजय सावंत आणि त्यांची मुलगी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
येरवडा येथील गणेशनगर परिसरात राहणारे दिनेश उद्धवराव मुन (वय ३९) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांच्या पत्नी पुनम दिनेश मुन हिचे ॲड. संजय सावंत यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. या कारणातून स्वाती सावंत, तिची मुलगी आणि ॲड. संजय सावंत यांनी संगनमत करून कट रचल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २ वाजल्यापासून १७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंतच्या कालावधीत जुना मुंढवा रोड, संदीप हॉटेलजवळील ॲड. सावंत यांच्या कार्यालयात पुनम मुन हिचा खून करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १६१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ६१(२), ३(५) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक (सुधारणा) अधिनियम २०१५ चे कलम ३(२)(va) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच चंदननगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक तपास सुरू केला. तपासादरम्यान ॲड. संजय सावंत आणि त्यांच्या मुलीला ताब्यात घेण्यात आले. तर महिला आरोपी स्वाती सावंत हिला पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ ने ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे खूनप्रकरणातील तिन्ही आरोपींना अवघ्या सहा तासांत जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त नुतन पवार करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजन कुमार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख, पोलीस निरीक्षक राम राजमाने तसेच चंदननगर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
