पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा राजकीय घडामोडींचा धडाका उडाला असून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्यकारिणीच्या बैठकीत ही घोषणा करताना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी ठाम शब्दांत नेतृत्वबदलाची घोषणा केली आणि पक्ष नव्या जोमाने भरारी घेईल, असा विश्वास व्यक्त केला.

पटेल यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वगुणांचं तोंडभरून कौतुक करत भावनिक वातावरण निर्माण केलं. “व्यक्ती पदानं नव्हे तर कर्तृत्वानं मोठी होते. दादा कधीच खचले नाहीत,” अशा शब्दांत त्यांनी अजितदादांच्या कार्यशैलीचा गौरव केला. त्यांच्या नेतृत्वामुळेच राष्ट्रवादीने वैभवाचे दिवस पाहिले, असेही ते म्हणाले.

दरम्यान, भाषणात नाव न घेता आमदार रोहित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधत पटेल म्हणाले, “ज्यांचा पक्षाशी संबंध नाही ते आम्हाला उपदेश देत आहेत. पोटात एक आणि ओठात एक अशी त्यांची अवस्था आहे.” या वक्तव्यामुळे अधिवेशनात राजकीय खळबळ उडाली.

२८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात अजित पवारांचे निधन झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. २०२४ मध्ये बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढवताना त्यांचा पराभव सुप्रिया सुळे यांनी केला होता. त्यानंतर त्यांची राज्यसभावर नियुक्ती झाली.

आता अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर त्या राज्यसभेचा राजीनामा देत बारामतीतून विधानसभेची पोटनिवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. पक्षात सत्ता आणि नेतृत्व दोन्ही सुनेत्रा पवार यांच्या हातात केंद्रीत झाल्याने राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *