
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : आषाढी एकादशीनिमित्त डाळींब (बन) येथील श्री विठ्ठल देवस्थानात शनिवारी (दि. २५) श्री विठ्ठलाची महापूजा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली. यावेळी माजी आमदार रमेश थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. महापूजेनंतर सभामंडपात आयोजित कार्यक्रमात देवस्थानाच्या विकासासंदर्भातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र ज्ञानोबा कांचन यांनी देवस्थानासाठी भक्तनिवासाला मंजुरी मिळाल्याची माहिती दिली. तसेच शिंदवणे ते डाळींब हा अरुंद रस्ता रुंद करण्याची आवश्यकता अधोरेखित करत पुरंदर तालुक्यातून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी रस्ते विकासाची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत, अशी मागणी केली. यावेळी ‘विठ्ठल बन’ या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. दरवर्षी सुमारे तीन लाख भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येथे येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी परिसरातील रस्त्यांच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले. वारकरी संप्रदाय समाजप्रबोधनाचे मोठे कार्य करत असून वारी आणि प्रवचनाच्या माध्यमातून समाजात संस्कार, समता आणि एकात्मतेची भावना रुजवत असल्याचे त्यांनी सांगितले. हडपसर ते यवत उड्डाणपूल तसेच जमीन समांतर सहापदरी रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे–सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माजी आमदार रमेश थोरात तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या वैशाली नागवडे यांनीही मनोगत व्यक्त करत श्री विठ्ठल देवस्थानाच्या धार्मिक आणि सामाजिक कार्याचे कौतुक केले.

या प्रसंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र ज्ञानोबा कांचन, दौंड पंचायत समितीचे सभापती सुखदेव चोरमले, हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश कुदळे, डाळींबचे सरपंच बजरंग म्हस्के, गटविकास अधिकारी अरुण मरभळ, यवत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष तासगांवकर, उरुळी कांचनचे सरपंच मिलिंद जगताप, वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, वनरक्षक गणेश म्हस्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे दौंड तालुकाध्यक्ष नितीन दोरगे, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुशांत दरेकर, संतोष कांचन, पंचायत समिती सदस्या राजश्री म्हस्के, माजी सहकार आयुक्त शैलेश कोथमीरे, ग्रामपंचायत अधिकारी विठ्ठल रावते, कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे, डाळींबचे माजी उपसरपंच सर्जेराव म्हस्के यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात पहाटे काकड आरतीने झाली. त्यानंतर श्री विठ्ठलाची महापूजा संपन्न झाली. दुपारी श्रींच्या पालखीची डाळींब गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. विविध गावांच्या ढोल-लेझीम पथकांनी आकर्षक सादरीकरण केले, तर भजन मंडळांनी भजनसेवा सादर केली. सायंकाळी हरिपाठ, श्री विठ्ठल आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था, डाळींब (बन) यांच्या वतीने कीर्तन आणि रात्री श्री माऊली कृपा कला नाट्यमंडळ, जांबूत यांच्या भजनी भारूडाने भाविक मंत्रमुग्ध झाले.
या धार्मिक सोहळ्याचे आयोजन श्री विठ्ठल देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ, डाळींब (बन) यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र ज्ञानोबा कांचन, उपाध्यक्ष नानासाहेब बबन म्हस्के, सचिव लक्ष्मण बाजीराव म्हस्के, खजिनदार बाळासाहेब काळुराम म्हस्के, व्यवस्थापक अरुण श्रीरंग म्हस्के, पुजारी हृषीकेश श्रीकृष्ण भाले तसेच सर्व विश्वस्त आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. दिवसभर चाललेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांचा मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांनी लाभ घेतला.
बापुराव चौधरी उपसंपादक
