पुणे : लोणी काळभोर (ता. हवेली) परिसरातील मुळा-मुठा नदीच्या पात्रात अवैधरित्या टाकण्यात आलेल्या कचऱ्याला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली. या आगीमुळे परिसरात प्रचंड धुराचे लोट पसरले असून नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न शुक्रवारी उशिरापर्यंत सुरू होते.
देशभरात स्वच्छ भारत अभियानच्या माध्यमातून स्वच्छता व नदी संवर्धनासाठी प्रयत्न सुरू असताना, लोणी काळभोर येथे मात्र नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकून तो जाळण्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या पुणे शहरालगतच्या मोठ्या ग्रामपंचायती असून त्या पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गलगत आहेत. या भागात झपाट्याने शहरीकरण वाढत आहे. महामार्गालगत हॉटेल व्यवसाय, मंगल कार्यालये आणि विविध व्यावसायिक आस्थापना मोठ्या प्रमाणावर असल्याने दररोज ओला व सुका कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. मात्र, कचरा संकलन व त्यावरील प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक जागा व तांत्रिक प्रकल्प उपलब्ध नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.
नाइलाजास्तव दररोज सुमारे ३० ते ३५ ट्रॉलींहून अधिक कचरा थेट नदीपात्रात टाकला जात असल्याचे समोर आले आहे. परिणामी नदीपात्रात कचऱ्याचे ढीग साचले असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

यापूर्वीही साचलेल्या कचऱ्याला अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याच्या घटना घडल्या आहेत. शुक्रवारी लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात विषारी धूर निर्माण झाला. हा धूर परिसरातील वस्त्यांमध्ये पसरल्याने नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. डोळ्यांची जळजळ, घसा दुखणे व श्वसनाच्या तक्रारी वाढल्याचे स्थानिकांनी सांगितले. परिसरात अनेक शैक्षणिक संस्था असल्याने हजारो विद्यार्थी व नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
नदीपात्रातील कचऱ्यामुळे केवळ वायुप्रदूषण नव्हे, तर जलप्रदूषणाचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मुळा-मुठा नदीचे पाणी दूषित होत असून जलचरांच्या अस्तित्वालाही धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे. या प्रकारामुळे पुणे शहराची तसेच राज्याची प्रतिमा मलीन होत असल्याचीही भावना व्यक्त होत आहे.
घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र जागेची मागणी
घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शाश्वत घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा उभारावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे.
लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींसाठी कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, अशीही जोरदार मागणी पुढे येत आहे.