दत्तात्रय आसवले, प्रतिनिधी

पुणे : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून ‘भरोसा वेल्फेअर फाउंडेशन, पुणे’ यांच्या वतीने शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) एका भव्य ऑनलाईन ‘कवी संमेलनाचे’ यशस्वी आयोजन करण्यात आले. ‘उत्सव प्रतिभेचा… आनंद कवितेचा’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत कवींनी आपल्या विविध विषयांवरील कवितांनी रसिकांची मने जिंकली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भरोसा वेल्फेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. नवनाथ शिंदे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत या काव्य संमेलनाचा हेतू स्पष्ट केला. ते म्हणाले की, “मराठी भाषेचा समृद्ध वारसा जपण्यासाठी आणि कवींच्या प्रतिभेला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपली संस्कृती आणि अस्मिता आहे, ती जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न संस्था करत आहे.”

संमेलनाचे अध्यक्ष, प्रसिद्ध कवी व गीतकार श्री. हनुमंत चांदगुडे (पाठ्यपुस्तकातील कवी) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेच्या आणि साहित्याच्या वैभवशाली वाटचालीचा आढावा घेतला. ते म्हणाले, “मराठी कवितेचा प्रवास हा ‘संत, पंत आणि तंत’ अशा त्रिधारांतून प्रवाहित झाला आहे.

संतांच्या अभंगातून संस्कार, पंतांच्या काव्यातून विद्वत्ता आणि तंतांच्या लावणी-पोवाड्यातून लोकसंस्कृती जोपासली गेली आहे.” यावेळी त्यांनी नवोदित कवींना मोलाचे मार्गदर्शन करताना वाचन वाढवण्याचे आणि सामाजिक भान जपण्याचे आवाहन केले.

या संमेलनात सहभागी कवींनी समाजातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या कविता सादर केल्या. यात मराठी भाषा, स्त्री विषयक जाणीवा, राजकीय भाष्य आणि ग्रामीण शेतकऱ्यांचे जळजळीत प्रश्न मांडणाऱ्या कवितांनी श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला. विशेषतः शेतीतील वाढते यांत्रिकीकरण आणि बैलांचा अस्त होत चालल्याची खंत कवींनी व्यक्त केली. ‘विठ्ठल’, ‘शेतकरी’ आणि ‘आईचे नसणे’ या विषयावरील कवितांनी उपस्थितांना भावूक केले. तर जीवनासंबंधीची गूढ तत्वज्ञान मांडणारी काव्ये आणि ‘मिसळ पाव’ सारख्या विषयांवरील विनोदी कवितांनी संमेलनात हास्याची कारंजी उडवत दाद मिळवली.

या संपूर्ण कवी संमेलनाचे सूत्रसंचालन संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्रा. श्री. दत्तात्रय आसवले यांनी अत्यंत बहारदार पद्धतीने केले. त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत आणि चपखल काव्यपंक्तींचा वापर करत प्रत्येक कवीचा परिचय करून दिला, ज्यामुळे कार्यक्रमाची रंगत द्विगुणित झाली. त्यांच्या खुसखुशीत आणि प्रभावी निवेदनाने श्रोत्यांना कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत खिळवून ठेवले.

या संमेलनात महाराष्ट्राच्या विविध भागांतील कवींनी सहभाग नोंदवला.

यात प्रामुख्याने:
कवी विनोद अष्टुळ (अध्यक्ष, साहित्यसम्राट पुणे), कवी किरण गाढवे (बारामती), कवी दत्तू ठोकळे (सोलापूर), कवी प्रतिभा विभुते (नाशिक), कवी ॲड. अनिता देशमुख (जळगाव), कवी मालन गायकवाड (शिरूर), कवी मनोज तेलोरे (राहुरी) आणि कवी वैभव धस (सांगली) कवी रोहिणी मदने (आळे)*या कवींच्या कवितांनी कार्यक्रमात रंगत भरली.

कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे व्यवस्थापकीय अध्यक्ष मा. प्रा. श्री. सुरेश शिंदे यांनी सर्व उपस्थित कवी आणि रसिक श्रोत्यांचे आभार मानले. कवींनी आपल्या शब्दांतून समाजाचा आरसा दाखवला आणि श्रोत्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळेच हा सोहळा यशस्वी झाल्याचे त्यांनी नमूद केले. हा कार्यक्रम दूरदृश्यप्रणालीद्वारे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक व सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *