दत्तात्रय आसवले, प्रतिनिधी
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (नियोजन आणि विकास विभाग) आणि रमेश फिरोदिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, साकूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उच्च शिक्षण आणि शाश्वत विकास’ या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रात राज्यातील विविध महाविद्यालयांतील संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गीत व राज्य गीताने झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन रमेश फिरोदिया आर्किटेक्ट महाविद्यालय (वाळुंज) चे प्राचार्य मा. आर्किटेक्ट प्रा. सुहास चौधरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले.
संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रो. डॉ. अरुण गायकवाड यांनी बीजभाषक म्हणून मार्गदर्शन करताना सांगितले की, “नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) हे केवळ बदलाचे माध्यम नसून ते शाश्वत विकासाचा पाया रचणारे धोरण आहे. शिक्षण हे पदवी मिळवण्यापुरते मर्यादित न राहता ते ‘लोक-केंद्रित’ आणि ‘पर्यावरण-पूरक’ असावे. या धोरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये बहुविद्याशाखीय दृष्टिकोन विकसित होईल, जो भविष्यातील जागतिक आव्हाने पेलण्यासाठी आणि शाश्वत जीवनशैली निर्माण करण्यासाठी अनिवार्य आहे.”
यावेळी तज्ज्ञ साधन व्यक्तींनी मार्गदर्शन केले. त्यामध्ये प्राचार्य डॉ. संजय वाघ यांनी शाश्वत विकासावर सखोल भाष्य करताना सांगितले की, “शाश्वत विकास म्हणजे केवळ आर्थिक प्रगती नव्हे, तर नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करून भविष्यातील पिढीच्या गरजांशी तडजोड न करता केलेला विकास होय. उच्च शिक्षणाने विद्यार्थ्यांना पर्यावरणाप्रती संवेदनशील बनवले पाहिजे. जेव्हा आपण सौर ऊर्जा, जलसंधारण आणि शून्य कचरा यांसारख्या संकल्पना शैक्षणिक संकुलात राबवू, तेव्हाच खऱ्या अर्थाने शाश्वत विकासाची बीजे रुजतील,” असे मत त्यांनी मांडले.

डॉ. नंदकुमार उदार यांनी ‘उच्च शिक्षणापुढील आव्हाने’ यावर भाष्य करताना सांगितले की, “आजचे उच्च शिक्षण केवळ माहिती देणारे केंद्र न राहता ते ज्ञान निर्मितीचे केंद्र बनले पाहिजे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार आणि मूल्यधिष्ठित शिक्षण पोहोचवणे हे मोठे आव्हान आहे. जोपर्यंत आपण शिक्षण पद्धतीत लवचिकता आणि नाविन्य आणणार नाही, तोपर्यंत जागतिक स्पर्धेत आपण टिकू शकणार नाही.”
प्राचार्य डॉ. संध्या खेडेकर यांनी ‘ए.आय. (Artificial Intelligence) टेक्नॉलॉजी’ चा उच्च शिक्षणामध्ये वापर केल्याने शाश्वत विकास कसा साध्य होतो, यावर प्रकाश टाकला. तंत्रज्ञानामुळे संसाधनांचा अपव्यय टाळून कार्यक्षमता वाढवता येईल, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. हेमलता राठोड यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी नमूद केले की, “उच्च शिक्षण हे केवळ माहिती देणारे नसावे, तर ते समाजाच्या शाश्वत प्रगतीचा आधार असावे. संशोधक प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी स्थानिक समस्यांवर जागतिक दर्जाचे संशोधन करावे.”
या चर्चासत्रात विविध विद्यापीठांतून आणि महाविद्यालयातून आलेल्या संशोधकांनी आणि प्राध्यापकांनी आपले संशोधनात्मक शोधनिबंध (Research Papers) सादर केले. सहभागी विद्यार्थ्यांनी देखील या सत्रात सक्रिय सहभाग नोंदवला.
समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. नाना दिघे उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी सांगितले की, “उच्च शिक्षणाच्या माध्यमातून समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टी, पर्यावरणाबद्दलची जाणीव आणि सामाजिक बांधिलकी निर्माण झाली पाहिजे. शाश्वत विकास ही केवळ संकल्पना नसून ती प्रत्येक शैक्षणिक संस्थेच्या कृतीतून दिसली पाहिजे. अशा राज्यस्तरीय चर्चासत्रांमुळे संशोधनाला चालना मिळते आणि विद्यार्थ्यांना नव्या विचारांची दिशा मिळते.”
समारोप सत्राचे अध्यक्षपद उपप्राचार्य डॉ. सचिन घोलप यांनी भूषविले. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले की, “अशा प्रकारच्या चर्चासत्रांतून निर्माण होणारे विचारमंथन उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते. शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्यासाठी तंत्रज्ञान आणि मानवी मूल्ये यांचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे.”
या प्रसंगी महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य मा. श्री. दिपकजी फिरोदिया उपस्थित होते. प्रा. म्हतू खेमनर यांनी प्रास्ताविक केले, तर प्रा. गणेश कुलकर्णी व प्रा. संदिप खेमनर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दत्तात्रय आसवले व प्रा. आरजू शेख यांनी केले. उद्घाटन सत्राचे आभार प्रा. रंजित गिरी यांनी मानले. समारोप सत्राचे प्रास्ताविक प्रा. पोपट खेमनर यांनी केले, तर संपूर्ण चर्चासत्राचे आभार समन्वयक प्रा. कल्पना शेळके यांनी मानले.
सदर चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.