
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : विठ्ठल भक्तीची ओढ आणि निसर्गप्रेमाची जोड लाभलेल्या वातावरणात ‘कस्तुरी प्रतिष्ठान’च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन १००० झाडे’ या महत्त्वाकांक्षी वृक्षारोपण अभियानाचा उत्साहपूर्ण शुभारंभ डाळींब बन येथे झाला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच समाजसेवेची नवी दिशा अधोरेखित करणाऱ्या या उपक्रमाने उपस्थितांच्या मनावर भावनिक छाप उमटविली.

कार्यक्रमस्थळी आगमन करणाऱ्या प्रत्येकाचे विठू नामाचा टिळा लावून स्वागत करण्यात आले. भक्ती, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकी यांचा त्रिवेणी संगम साधणाऱ्या या उपक्रमामुळे परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी राबविण्यात आलेल्या एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाने सर्वांची मने जिंकली. अनेक ज्येष्ठ नागरिकांना स्वतःची जन्मतारीख माहिती नसल्याची बाब लक्षात घेऊन, अशा आजी-आजोबांचा वाढदिवस झाडे लावून आणि केक कापून साजरा करण्यात आला. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून त्यांच्या जीवनप्रवासाला सन्मानपूर्वक अभिवादन करण्यात आले. या भावनिक क्षणांनी अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले.

‘मिशन १००० झाडे’ अंतर्गत परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश घराघरांत पोहोचविण्याचा निर्धार कस्तुरी प्रतिष्ठानने व्यक्त केला. “जशी ही रोपे भविष्यात विशाल वृक्ष बनतील, तसतसे समाजसेवेचे कार्यही अधिक व्यापक आणि परिणामकारक होवो,” अशी प्रार्थना यावेळी पांडुरंगाच्या चरणी करण्यात आली.
उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणाची शपथ घेत वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारली. सामाजिक जाणीव, पर्यावरणाविषयीची आस्था आणि ज्येष्ठांविषयीचा आदर यांचा सुंदर मिलाफ घडवून आणणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला.
“प्रार्थना करणाऱ्या ओठांपेक्षा मदत करणारे हात अधिक पवित्र असतात,” या विचाराला अनुसरून कस्तुरी प्रतिष्ठानचे समाजोपयोगी उपक्रम भविष्यातही अधिक जोमाने आणि व्यापक स्वरूपात सुरू राहतील, असा विश्वास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे यांनी व्यक्त केला.

यावेळी सदाशिव सुतार, अरुण म्हस्के, भाऊ भंडलकर, गौरव काटे, उत्कर्ष मेमाणे, रतन चव्हाण, सोमनाथ म्हस्के व तानाजी म्हस्के आदी उपस्थित होते.