सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : सांस्कृतिक परंपरा, सामाजिक बांधिलकी आणि ज्येष्ठांच्या अनुभवसंपदेचा गौरव यांचा सुंदर संगम उरुळी कांचन येथे नुकताच अनुभवायला मिळाला. गावाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याचे कार्य करणाऱ्या कांचन परिवाराच्या पुढाकारातून आयोजित आदर्श ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात आणि कौटुंबिक जिव्हाळ्याच्या वातावरणात संपन्न झाला.

यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष देविदास भन्साळी यांनी, “आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात सकारात्मक विचार हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. उरुळी कांचनच्या सांस्कृतिक वारशाचे संवर्धन करणाऱ्या कांचन परिवाराचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे,” असे प्रतिपादन केले.

या प्रसंगी अरुणा हेंद्रे, रत्नप्रभा भोर, ज्ञानदेव लिंबोरे, गुलाबराव गायकर, सोपान शितोळे आणि राजेश फुलपगर यांचा वाढदिवस साधेपणाने, मात्र उत्साहपूर्ण वातावरणात निखिल भैय्या कांचन मित्र परिवाराच्या वतीने साजरा करण्यात आला.

युवा उद्योजक निखिल भैय्या कांचन यांनी आपल्या मनोगतात ज्येष्ठांविषयीची कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, “दिशादर्शक आणि मार्गदर्शक योग्य असतील तर जीवनातील निर्णय कधीच चुकत नाहीत. आमच्या आयुष्याचा सुवर्णकाळ ज्येष्ठांच्या अनुभव, संस्कार आणि मार्गदर्शनातून घडला आहे. त्यांचे प्रेम, त्याग आणि आशीर्वाद हीच आमची खरी संपत्ती आहे.”

कार्यक्रमात उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आयुष्यातील अनुभव, आठवणी आणि समाजजीवनातील विविध पैलूंवर मनोगते व्यक्त केली. त्यामुळे कार्यक्रमाला भावनिक आणि प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले.


कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवाजी नाना कांचन यांनी प्रास्ताविकातून सोहळ्याची भूमिका मांडत ज्येष्ठांच्या योगदानाचा गौरव केला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार एम. जी. शेलार, नारायण कांचन, महंत गोपालव्यास कपाटे, कोंडिराम चौधरी, एकनाथ चौधरी, सोनबा चौधरी, पंडित महाडिक, प्रतिभा कांचन, सुरेखा भन्साळी, शिल्पा लेले, प्रसन्न भोर, राजेंद्र कांचन, दादा गोते, सुरेश सातव, संदीप कांचन, सचिन कांचन, सुनिल तुपे, सारिक सय्यद आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शेवटी पत्रकार सुवर्णा कांचन यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.
ज्येष्ठांच्या आशीर्वादाची ऊब, संस्कारांचा वारसा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा सोहळा उरुळी कांचनच्या सामाजिक जीवनात संस्मरणीय ठरला.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *