पुणे : कुटुंबाचा आधारस्तंभ आणि समाजाचा दिशादर्शक ठरलेल्या जेष्ठ नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक हृदयस्पर्शी सोहळा नुकताच उरुळी कांचन येथे उत्साहात पार पडला. आयुष्यभर कुटुंब व समाजासाठी निस्वार्थीपणे योगदान देणाऱ्या ज्येष्ठांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थितांच्या मनात आदराची भावना दाटून आली.

युवा उद्योजक निर्माण डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा निखिल भैय्या कांचन यांनी जेष्ठांविषयी मनोगत व्यक्त करताना, “ज्येष्ठांचे योगदान अमूल्य असून त्यांना उत्तम आरोग्य, आनंद आणि समृद्ध आयुष्य लाभावे, हीच आमची भावना आहे,” असे सांगितले. त्यांच्या या विचारांतून कार्यक्रमाची प्रेरणा अधोरेखित झाली.

दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत जेष्ठ नागरिकांना एकत्रित बोलावून शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते. हितचिंतक, मित्रपरिवार व आप्तेष्टांच्या उपस्थितीत साजऱ्या होणाऱ्या या सोहळ्याला भावनिक ऊब लाभते. प्रास्ताविक, मनोगत, सन्मान व आभार अशा छोटेखानी स्वरूपाच्या कार्यक्रमात सत्कारमूर्तींच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद उपस्थितांना भावूक करून जातो.
नुकत्याच पार पडलेल्या या सोहळ्यात दत्तात्रय चौधरी, जनार्धन गोते, दिंगबर चंद आणि अशोक कांचन यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मधुकर घारे, नामदेव फडतरे, लखमजी पटेल, सिकंदर शेख, पंडित महाडिक, घनश्याम वर्मा, ज्ञानदेव लिंबोरे, भाऊसाहेब महाडिक, नारायण कांचन, शहाजी मोरे, विठ्ठलराव कामठे, अलका साळुंखे, प्रभाकर खरात, अशोकराव गोटे, पुरुषोत्तम काकडे, फडतरे, कोकाटे, मेमाणे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उरुळी कांचन पतसंस्थेचे संचालक शिवाजी कांचन यांनी केले, तर सूत्रसंचालन पुरुषोत्तम काकडे यांनी केले. कृतज्ञता, सन्मान आणि प्रेरणेची सुंदर सांगड घालणारा हा उपक्रम समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा ठरत आहे.