पुणे : उरुळी कांचन पोलिस स्टेशनच्या हद्दीत गांजा विक्रीप्रकरणी पोलिसांनी धाड टाकून एका संशयितास ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ८७३ ग्रॅम गांजा व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ९.५५ वाजण्याच्या सुमारास तुपेवस्ती, ढमढेरे कॉलनी येथील स्वयंभू सोसायटीमधील रूम क्रमांक ४०६ येथे ही कारवाई करण्यात आली. फिरोज महमद शेख (वय ३०) हा गांजा विक्रीसाठी साठा करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला.

या कारवाईत आरोपीकडून सुमारे १५,७१४ रुपये किमतीचा ८७३ ग्रॅम गांजा तसेच ५०० रुपये किमतीचा वजन काटा असा एकूण १६,२१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिस शिपाई सुमित नंदकुमार वाघ (उरुळी कांचन पोलिस स्टेशन) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एन.डी.पी.एस. कायदा कलम ८(सी), २०(बी)(ii)(A) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा २४ मार्च रोजी पहाटे ३.३८ वाजता नोंदविण्यात आला.
दरम्यान, आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून अटकेची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वी लोणी काळभोर पोलिस स्टेशन येथे गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलीसांनी दिली.
सदर कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण कांबळे यांच्यासह पथकाने केली आहे