पुणे : तुपे वस्ती येथे ज्योतिबा उत्सव समितीच्या वतीने आयोजित ‘दख्खनचा राजा श्री जोतिबा यात्रा २०२६’ हा उत्सव बुधवारी (ता. १ ) भक्तिभाव, उत्साह आणि पारंपरिक दिमाखात संपन्न झाला.
पहाटेपासूनच परिसरात भाविकांची उसळलेली गर्दी, ढोल-ताशांचा गजर आणि ‘जय जोतिबा’च्या घोषणांनी वातावरण अक्षरशः भारावून गेले.

सकाळी आठ वाजता श्रींच्या अभिषेकाने उत्सवाची मंगल सुरुवात झाली. त्यानंतर सकाळी नऊ ते बारा या वेळेत श्रींची काठी आणि पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. टाळ-मृदंगाच्या निनादात, रंगीबेरंगी फुलांनी सजविलेल्या पालखीतून श्रींचे दर्शन घेताना भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत श्रद्धेचा अनोखा आविष्कार घडवून आणला.

दुपारी साडेबारा ते तीन या वेळेत आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. भक्ती आणि सेवा यांचा संगम घडवत महाप्रसादाच्या व्यवस्थेने सर्वांचे मन जिंकले. सायंकाळी चार ते सहा या वेळेत झालेल्या भजन कार्यक्रमात स्थानिक भजन मंडळांनी सुमधुर भक्तिगीते सादर करत वातावरणात अधिकच भक्तिरसाची उधळण केली.
त्यानंतर सायंकाळी सात ते नऊ या वेळेत पुन्हा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. दिवसभर चाललेल्या या धार्मिक सोहळ्यात भाविकांनी शिस्तबद्ध सहभाग नोंदवून आदर्श घालून दिला.
तुपे परिवार तसेच समस्त ज्योतिबा भक्तांच्या सहकार्याने उत्सव यशस्वीरीत्या पार पडला. आयोजकांनी सर्वांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.