बापुराव चौधरी, उपसंपादक
पुणे : यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कै. भिमराव (मामा) यशवंत टिळेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तसेच कै. शेवंताबाई गुलाब तांबे आणि वॉर्ड क्रमांक ३ मधील दिवंगत नागरिकांच्या स्मरणार्थ आयुष्यमान कार्ड वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हे शिबिर शुक्रवार, दि. ३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत बायफ रोड, कांचनपार्क शेजारी, उरुळी कांचन येथे पार पडणार आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आयुष्यमान स्मार्ट कार्ड केवळ १० मिनिटांत उपलब्ध करून देण्याची सुविधा या शिबिरात उपलब्ध असणार आहे.

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत नागरिकांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य विमा संरक्षण मिळते. या योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरासाठी नागरिकांनी केवळ आधारकार्ड सोबत आणणे आवश्यक असून, कोणतेही अतिरिक्त सेवाशुल्क आकारले जाणार नाही. मात्र, कार्ड प्रिंटसाठी नाममात्र ५० रुपये शुल्क घेतले जाणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, या शिबिरात नागरिकांसाठी मोफत शुगर तपासणी आणि रक्तदाब (बी.पी.) तपासणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य तपासणीसोबतच विमा संरक्षणाचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी मिळणार आहे.
ज्या नागरिकांनी पूर्वी आयुष्यमान कार्डसाठी नोंदणी केली आहे, परंतु त्यांना अद्याप कार्ड प्राप्त झाले नाही, अशा नागरिकांनी देखील या शिबिरात आधारकार्डसह उपस्थित राहावे. त्यांना त्यांच्या कार्डची तत्काळ प्रिंट देण्यात येणार आहे.
या उपक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत सदस्य तसेच विश्वस्त श्रीकाळभैरवनाथ सेवा समिती ट्रस्टचे श्री. सुनिल (आबा) आबुराव तांबे यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. या सामाजिक उपक्रमामुळे गरजू व सर्वसामान्य नागरिकांना मोठा लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले.
या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.