पुणे : अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीविरोधात लोणी काळभोर पोलिसांनी धडक कारवाई करत २ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून, पुरवठादारालाही अटक करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत शनिवारी (दि. ४ एप्रिल) सकाळी तपास पथकाने परिसरात गस्त घालत कारवाई केली.

गस्तीदरम्यान आलमगीर जामा मशिद कब्रस्तान परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये मुबारक जाफर गड्डे (वय ४८) व बानो मुबारक गड्डे (वय ४०) हे ५०० लिटर क्षमतेच्या टाकीत साठवलेली सुमारे ४५० लिटर हातभट्टी दारू प्लास्टिक कॅनमध्ये भरून विक्रीसाठी तयार करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तात्काळ छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले.
या कारवाईत ४५ हजार रुपये किमतीची दारू, १.५० लाख रुपये किमतीची अल्टो कार, तसेच टीव्हीएस ज्युपिटर व होंडा अॅक्टिवा या दुचाकींसह एकूण २.९५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासात ही दारू समीर संजय राठोड (वय २३, रा. शिंदवणे) याच्याकडून घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.