बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : आयुष्यभर कर्तव्यनिष्ठेची पताका फडकवत, समर्पणाच्या सुवर्णरेषांनी कार्यभूमी उजळवणारे पुरोगामी माध्यमिक विद्यालय, नायगाव येथील जेष्ठ सेवक श्री. सुरेश रामचंद्र कांचन यांचा सेवापूर्ती सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. तब्बल अडतीस वर्षांच्या अखंड सेवेनंतर नियत वयोमानानुसार निवृत्त होत असलेल्या कांचन यांना सोमवार (दि. ६ एप्रिल २०२६) रोजी सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.

या प्रसंगी योगी निरंजन नाथ गुरू शांतीनाथ महाराज यांच्या हस्ते कांचन दाम्पत्याचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब चोरघे होते. संपूर्ण सभागृहात कृतज्ञतेची आणि आठवणींची दरवळ पसरली होती.

आपल्या मनोगतात महाराजांनी जीवनमूल्यांची शिकवण देत सांगितले, “जे काम हाती घ्याल, ते समर्पण आणि आत्मविश्वासाने करा; यश तुमच्या पायाशी नतमस्तक होईल. भौतिक सुखांच्या मागे धावताना मन:शांती हरवू नये, यासाठी आध्यात्माची जोड अत्यावश्यक आहे.” कांचन यांच्या कार्यपद्धतीत हीच साधना दिसून येते, असेही त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय भाषणात बाळासाहेब चोरघे यांनी कांचन यांच्या योगदानाचे कौतुक करताना, “पुरोगामी विद्यालयाला लाभलेले हे एक अनमोल लेणं आहे. त्यांच्या निवृत्तीनंतर निर्माण होणारी पोकळी निश्चितच जाणवेल,” अशा भावना व्यक्त केल्या. शाळेच्या स्वच्छतेपासून ते नियोजनापर्यंत प्रत्येक घटकात त्यांचा सहभाग संस्थेसाठी आधारस्तंभ ठरला होता, असे त्यांनी सांगितले.

संस्थेचे सचिव रंगनाथ आप्पा कड यांनी कांचन यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा गौरव करताना, “एक हरहुन्नरी कलाकार म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या ढोलकीच्या तालावर रंगणारी विद्यार्थ्यांची लेझीम ही आठवण कायम स्मरणात राहील,” असे भावपूर्ण शब्दांत नमूद केले.

या सोहळ्यास संस्थेचे उपाध्यक्ष रामदास चौधरी, विश्वस्त दत्तात्रय चौधरी, भिकाजी चौधरी, शिवाजी चौधरी, ह.भ.प. बाळासाहेब (आप्पा) चौधरी, सोनबा चौधरी, रवींद्र चौधरी, पंचायत समिती सदस्य मनोज चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक कसबे, सामाजिक कार्यकर्ते बंडोपंत चौधरी, शितल चौधरी, माजी मुख्याध्यापिका रागिणी चौधरी, तसेच अनेक मान्यवर, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन मुख्याध्यापक प्रवीण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सूत्रसंचालन दिलीप थोपटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सविता देवकर यांनी मानले.
सुरेश कांचन यांच्या सेवेचा हा सोहळा म्हणजे केवळ निरोप नव्हे, तर एका समर्पित प्रवासाचा गौरवशाली उत्सव ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *