बापुराव चौधरी, उपसंपादक
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यंदा पुणे स्टेशन येथील त्यांच्या पुतळा परिसरात एक वेगळ्या धाटणीचा, वैचारिक आणि क्रांतिकारी उत्सव साजरा केला जाणार आहे. ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती’च्या आवाहनाला प्रतिसाद देत भिमसेवा प्रतिष्ठान व स्थानिक कार्यकर्त्यांनी गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेली स्पीकर (डीजे) परंपरा यंदा कायमची बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

मिरवणुकांमधील मोठ्या आवाजाचा मानवी आरोग्यावर होणारा दुष्परिणाम लक्षात घेऊन तसेच अलीकडील काही दुर्दैवी घटनांमधून बोध घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. स्पीकरवर होणारा अवाढव्य खर्च टाळून यंदा १,००० अनुयायांना महापुरुषांच्या विचारांची पुस्तके मोफत वाटण्यात येणार आहेत. “वाचाल तर वाचाल” हा संदेश कृतीतून रुजवण्याचा यामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे ३० फूट उंचीचे तथागत गौतम बुद्ध यांचे भव्य बुद्धरूप दर्शन. यासोबतच “गोंगाटात विचार हरवू नका” हा संदेश देणारा तथागत बुद्ध, सम्राट अशोक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘तीन पात्री मूकपट’ (Silent Play) सादर केला जाणार आहे. शांततेच्या माध्यमातून विचारांचा जागर करण्याचा हा प्रयत्न असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
हा निर्णय मा. रामभाऊ डंबाळे (संस्थापक अध्यक्ष), मा. राहुलभाऊ डंबाळे (मार्गदर्शक) आणि मा. सुवर्णाताई डंबाळे (रिपब्लिकन नेत्या) यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धांत सुर्वे, प्रदीप कांबळे, निखिल बहुले, अविराज मराठे व नासिर खान या कार्यकर्त्यांनी एकमताने घेतला आहे.
पुणे स्टेशन परिसरात अभिवादनासाठी मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या अनुयायांची गर्दी लक्षात घेता, ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी तसेच ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून इतर मंडळांनीही स्पीकरचा वापर टाळावा, असे आवाहन मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केले आहे.