बापुराव चौधरी, उपसंपादक
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांची आज मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) श्री. ओमप्रकाश दिवटे यांनी पाहणी करून आढावा घेतला. यावेळी मुख्य अभियंता (प्रकल्प) श्री. दिनकर गोजारे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या पाहणीची सुरुवात साधू वासवानी पूल येथून करण्यात आली. त्यानंतर आगा खान नदी पूल, शास्त्रीनगर उड्डाणपूल व अंडरपास, विश्रांतवाडी उड्डाणपूल व अंडरपास तसेच बिंदू माधव ठाकरे चौक उड्डाणपूल या महत्त्वाच्या प्रकल्पांची पाहणी करण्यात आली.अतिरिक्त आयुक्तांनी प्रत्येक प्रकल्पाची सविस्तर माहिती घेत कामांची सद्यस्थिती, प्रगती, तसेच येणाऱ्या अडचणींबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

कामांमध्ये होत असलेल्या विलंबाची त्यांनी गांभीर्याने नोंद घेत संबंधित कंत्राटदारांना निर्धारित वेळेत कामे पूर्ण करण्याचे सक्त निर्देश दिले. तसेच, प्रकल्पांची गती वाढवून ती लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याचे आदेश देण्यात आले.
प्रत्येक प्रकल्पासाठी सविस्तर ‘बार चार्ट’ तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्याचे परीक्षण अतिरिक्त आयुक्तांच्या स्तरावर केले जाणार आहे. यापुढे प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी दर महिन्याला नियमित बैठकांचे आयोजन करण्यात येणार असून, एक बैठक कार्यालयात तर दुसरी प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी महापालिकेकडून विविध महत्त्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आले असून, ते वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.