बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून भारताची ओळख कृषीप्रधान देश म्हणून जगभर आहे. आधुनिक तंत्रज्ञान व अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या वापरामुळे शेती क्षेत्रात मोठी क्रांती घडत आहे. महाराष्ट्रातील शेतकरी जमिनीचा कस ओळखून शेती करणारा असून जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायातही प्रगती करत आहे. अशा कृषी प्रदर्शनांचे राज्यभर आयोजन करणे हीच अजित दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन सिनेअभिनेते प्रविण तरडे यांनी केले.

थेऊर येथे दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठान आयोजित ‘अजित कृषी महोत्सवा’चे उद्घाटन प्रविण तरडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके, माजी संचालक महादेव काकडे, पांडुरंग काळे, हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे, उपसरपंच आप्पासाहेब काळे, दत्तात्रय कुंजीर, विलास कुंजीर, संतोष मुरकुटे, यशवंतचे माजी व्हाइस चेअरमन मोरेश्वर काळे, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना प्रविण तरडे यांनी प्रतिष्ठानच्या वतीने वर्षभर राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. तसेच ‘अजित कृषी महोत्सवा’मुळे स्थानिक शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके यांनीही महोत्सवाचे कौतुक करत शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले. प्रदर्शनात बदलती शेती, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळवता येईल याबाबत कृषी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

महोत्सवात महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम, डॉग शो तसेच पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संयुक्त विद्यमाने खिलार बैलांचा रॅम्प वॉक हे विशेष आकर्षण ठरणार आहे. हा आगळावेगळा उपक्रम असून शेतकरी बांधवांनी सहपरिवार उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन निमंत्रक पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *