बापुराव चौधरी, उपसंपादक
पुणे : लोणी काळभोर पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या गंभीर लैंगिक अत्याचार व पोक्सो प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर येथील मा. न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत २० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

गुन्हा रजिस्टर क्रमांक ८८३/२०२० अंतर्गत भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६(२)(फ), ३७६(२)(एन), ५०६ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ३, ४, ५, ६ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणात विशेष सत्र प्रकरण क्रमांक ७०/२०२१ अंतर्गत सुनावणी झाली.
या प्रकरणातील आरोपी सुनील कोंडीबा जेधे (वय ५६, रा. भिवडी, ता. पुरंदर, जि. पुणे) यास मा. न्यायालयाने दोषी ठरवले. मा. न्यायाधीशांनी सीआरपीसी कलम २३५(२) नुसार शिक्षा सुनावत भारतीय दंड विधान कलम ३७६(२)(फ), ३७६(३) व पोक्सो कलम ४, ५, ६ अंतर्गत २० वर्षांची सक्तमजुरी व ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच भा.द.वि. कलम ५०६ अन्वये एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा देण्यात आली.
या प्रकरणाचा तपास पोलिस अधिकारी व्ही. पी. झिंजुके (सध्या कोल्हापूर येथे कार्यरत) यांनी केला होता. न्यायालयीन कामकाजादरम्यान सरकारी अभियोक्ता श्रीमती अरुंधती ब्रम्हे यांनी प्रभावी बाजू मांडली.
सदर खटल्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. न्यायालयीन पैरवी पोलीस उपनिरीक्षक विनोद ज्ञानेश्वर कांबळे, महिला पोलिस हवालदार अश्विनी पवार व पोलीस शिपाई अशोक शिंदे यांनी केली.
दरम्यान, निकालाची अधिकृत प्रत प्राप्त होताच पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.