बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे होते.

यावेळी प्राचार्य डॉ. बोऱ्हाडे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याचा व विचारांचा आढावा घेतला.

शिक्षण, स्त्री-पुरुष समानता आणि सामाजिक न्यायासाठी फुले यांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या विचारांचा अवलंब करून समाजात समता व बंधुता निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधणारे आणि त्यांच्यावर पहिला पोवाडा लिहिणारे ‘क्रांतीसूर्य’ म्हणूनही महात्मा फुले यांची ओळख असल्याची माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाला सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शुभांगी धुमाळ-रानवडे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. सुजाता गायकवाड, कला विभाग प्रमुख डॉ. समीर आबनावे, इतिहास विभाग प्रमुख डॉ. अमोल बोत्रे, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे समन्वयक डॉ. निलेश शितोळे, प्रा. कमरुनिसा शेख, प्रा. अंजली शिंदे, प्रा. सारिका ढोणगे, कार्यालय अधीक्षक प्रदीप राजपूत तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *