बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खून व खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यात आरोपी शरिफ रज्जक शेख (वय २८, रा. आसरफनगर, कोंढवा) यास जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांनी ९ एप्रिल २०२६ रोजी दिला.

गुन्हा क्रमांक २५६/२०१९ अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (खून) व ३०७ (खुनाचा प्रयत्न) अन्वये हा खटला चालविण्यात आला होता. सेशन केस क्रमांक १११८/२०१९ मध्ये न्यायालयाने आरोपी दोषी ठरवित कठोर शिक्षा सुनावली.

न्यायालयाने सीआरपीसी कलम २३५(२) नुसार आरोपीस कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व १०,००० रुपयांचा दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांचा साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली. तसेच कलम ३०७ अंतर्गत दहा वर्षांची सक्तमजुरी व १०,००० रुपयांचा दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांची सक्तमजुरी अशी अतिरिक्त शिक्षा सुनावण्यात आली.

या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक नंदकुमार शेळके (सध्या सेवानिवृत्त) यांनी केला होता. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. संजय पवार यांनी प्रभावी युक्तिवाद केला.
या तपासात वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे तसेच गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उत्तम नामवाडे यांनी विशेष मार्गदर्शन केले.

न्यायालयीन कामकाजासाठी
पोलिस उपनिरीक्षक ज्ञानोबा महानवर यांनी पैरवी केली.
फरासखाना पोलिसांच्या काटेकोर तपासामुळे गंभीर गुन्ह्यात आरोपीला शिक्षा मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. निकालाची अधिकृत प्रत लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, पुण्यातील गणेश पेठ परिसरात एका तरुणीचा धारदार शस्त्राने खून केल्याची धक्कादायक घटना दि. २३ जुलै २०१९ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास नाडेगल्ली, १९७ गणेश पेठ येथील पोकळे यांच्या घरासमोर घडली होती.

मयत मुलगी नाझमीन हिचे आरोपीसोबत लग्न ठरले होते. मात्र काही कारणास्तव हे लग्न मोडले होते. याच कारणाचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादी यांना फोन करून बाहेर बोलावले. त्यानंतर आरोपीने नाझमीन हिच्यावर धारदार चाकूने हल्ला करत तिच्या पोटात वार करून तिचा जागीच खून केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *