बापुराव चौधरी, उपसंपादक
पुणे : उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीच्या स्काऊट-गाईड पथकातील तब्बल १८ विद्यार्थ्यांनी राज्य पुरस्कार परीक्षेत यश संपादन करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. भारत स्काऊट गाईड राज्य कार्यालयाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

दि. १२ ते १५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान झालेल्या स्काऊट विभागाच्या शिबिरात ६ विद्यार्थी यशस्वी झाले. त्यामध्ये आशिष भिमसेन रणदिवे, यशराज बाबुराव थोरात, विश्व राहुल जवळकर, सिद्धांत मल्लिनाथ शिंगे आणि उत्कर्ष प्रशांत किर्वे यांचा समावेश आहे.

तसेच, गाईड विभागाची राज्य पुरस्कार परीक्षा दि. १६ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत पार पडली. या परीक्षेत १२ विद्यार्थिनींनी यश मिळवले. स्वराली विशाल फडतरे, संस्कृती विशाल म्हेत्रे, स्वरा सुभाष वलटे, अंतरा प्रशांत बगाडे, अक्षरा सोमनाथ कदम, सिध्दी फुलचंद ढवळे, सिद्धी अशोक ठुले, सिध्दी विनोद शिवरकर, समृद्धी सचिन त्र्यंबके, कार्तिकी भागुजी कामठे आणि स्वरांजली रवींद्र गुंजाळ यांचा यामध्ये समावेश आहे.
या शिबिरासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यालयाचे स्काऊट शिक्षक नागेश काळभोर तसेच गाईड शिक्षिका दिपाली शिर्के व सुवर्णा कानडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
स्वामी विवेकानंद अकॅडमीची ही दुसरी बॅच असून सर्व विद्यार्थ्यांनी राज्य पुरस्कार परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे. या यशाबद्दल स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांसह विद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. पुढील राष्ट्रपती पुरस्कारासाठीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.