बापू चौधरी, उपसंपादक
पुणे : आदिवासी जीवनाच्या मातीतून उमललेले शब्द, बोलीभाषेच्या लयीत झुलणारी संवेदना आणि साहित्यिक जाणिवांचा समृद्ध आविष्कार यांचा संगम ठरलेले साहित्यिक भास्कर भोसले यांचे कार्य अलीकडेच राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा झळाळून उठले.

दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी साहित्य अकादमी व सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार यांच्या प्रतिष्ठित कार्यक्रमासाठी त्यांना विशेष निमंत्रण प्राप्त झाले होते. या निमित्ताने पारधी व वाघरी या आदिवासी बोलीभाषांतील त्यांच्या सृजनशील लेखनाला नवी दाद मिळाली.

भोसले यांनी आपल्या ‘मेघंळा’ या कवितासंग्रहातून प्रथमच देशपातळीवर पारधी-वाघरी भाषेचा स्वर मांडला. २०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या या संग्रहातील दोन निवडक कवितांना साहित्य अकादमी, नवी दिल्ली येथे सादर करण्याची संधी मिळणे, ही त्यांच्या साहित्यिक वाटचालीतील महत्त्वाची पायरी ठरली. शब्दांच्या या सादरीकरणातून आदिवासी संस्कृतीचा गहिरा ठसा उपस्थितांवर उमटला.
याचबरोबर साहित्य अकादमी पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळणे, हेही त्यांच्या कार्याची दखल घेतल्याचे प्रतीक ठरले. कार्यक्रमादरम्यान पारधी व वाघरी बोलीभाषांविषयी समजून सांगण्याची संधी मिळाल्याने त्यांनी या भाषिक परंपरेचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.
मार्च २०२४ मध्ये आयोजित साहित्य अकादमीच्या वर्ल्ड रेकॉर्ड कार्यक्रमातही भोसले यांचा सहभाग लक्षणीय ठरला. देशभरातील विविध बोलीभाषांतील तब्बल १७२ कवींनी सहभाग नोंदवलेल्या या उपक्रमाने जागतिक विक्रम प्रस्थापित केला. त्या गौरवाचे प्रमाणपत्र नुकतेच त्यांना प्राप्त झाले आहे.
‘दैना’ ही कादंबरी, ‘निधर्मी ऋतूप्रीत’ हा काव्यसंग्रह, तसेच आदिवासी संस्कृती व इतिहास यांवर आधारित लेखन आणि ‘मेघंळा’ सारखा कवितासंग्रह अशा विविध साहित्यनिर्मितीतून भोसले यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या लेखणीतून उमटणारा आदिवासी अस्मितेचा स्वर आता राष्ट्रीय पातळीवर अधिक दृढ होत असल्याचे चित्र या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.