बापुराव चौधरी, उपसंपादक
पुणे : गावातील प्रत्येक नागरिकाला निरोगी दृष्टी लाभावी आणि उरुळी कांचन गाव मोतीबिंदूमुक्त व्हावे, या उद्देशाने कस्तुरी ग्रुपच्या वतीने एक महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत १५ एप्रिल २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामुळे गावातील गरजू तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, हे शिबिर सोमवार ते शनिवार दररोज सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत आयोजित करण्यात येणार असून, पुणे-सोलापूर रोडवरील कस्तुरी एम्पायर येथे ते पार पडणार आहे. नागरिकांनी आपल्या सोयीने या वेळेत उपस्थित राहून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या उपक्रमात एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, मोहम्मदवाडी यांचे सहकार्य लाभले आहे. अनुभवी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार असून, आवश्यक असलेल्या रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रियाही विनामूल्य केली जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सुरक्षित आणि प्रभावी उपचार दिले जाणार असल्याने या शिबिराचे महत्त्व अधिक वाढले आहे.
ग्रामीण भागात अनेकदा आर्थिक अडचणींमुळे किंवा जागरूकतेअभावी डोळ्यांचे आजार दुर्लक्षित राहतात. विशेषतः मोतीबिंदू हा आजार ज्येष्ठांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो. वेळेवर उपचार न झाल्यास दृष्टी कमी होणे किंवा अंधत्व येण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा मोफत शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना योग्य वेळी उपचार मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
कस्तुरी ग्रुपचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे यांनी सांगितले की, “उरुळी कांचन गावातील प्रत्येक नागरिक निरोगी राहावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मोतीबिंदू हा टाळता येण्याजोगा आणि उपचाराने बरा होणारा आजार आहे. त्यामुळे गावातील एकाही नागरिकाला दृष्टीदोषामुळे त्रास होऊ नये, हा आमचा प्रयत्न आहे.”
या उपक्रमामुळे गावात आरोग्याविषयी जागरूकता वाढण्यास मदत होणार असून, मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होऊन या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.