बापुराव चौधरी, उपसंपादक
पुणे : “चवदार तळ्याचे पाणी पिऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ तहान भागवली नाही, तर शतकानुशतकांच्या अस्पृश्यतेच्या बेड्या खंडित करण्याचा क्रांतिकारी प्रारंभ केला,” असे प्रेरणादायी उद्गार माजी पर्यवेक्षक बाळकृष्ण काकडे यांनी काढले. साने संगीत क्लासेस व साने कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. आंबेडकर जयंती कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेच्या पूजनाने झाली. वातावरणात आदर, कृतज्ञता आणि प्रेरणेची सुमनं दरवळत असताना विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून आनंदोत्सवही साजरा करण्यात आला. “भारतीय संविधानाचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे अध्वर्यू, दीन-दुबळ्यांच्या हक्कांसाठी आयुष्य अर्पण करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन,” अशा शब्दांत माजी शिक्षणाधिकारी प्रभाकर खरात यांनी भावना व्यक्त केल्या.

यावेळी पंचायत समितीच्या माजी उपसभापती हेमलता बडेकर, सदस्या कोमल गणेश कांबळे, माजी शिक्षणाधिकारी प्रभाकर खरात, माजी पर्यवेक्षक बाळकृष्ण काकडे, पुणे जिल्हा महानुभाव परिषदेचे प्रचारमंत्री अमोल भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे सांस्कृतिक विभागाचे पुणे जिल्हा अध्यक्ष विजय तुपे, प्रा. सुरेश वाळेकर, पत्रकार सुवर्णा कांचन, सुनिल तुपे, साने कला मंचाच्या अध्यक्षा रेखा साने, पंकज लोंढे तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे सचिव शिवराज साने यांनी डॉ. आंबेडकरांच्या संघर्षमय जीवनाचा वेध घेतला. “प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत त्यांनी यशाची शिखरे गाठली. संकटे आली, परंतु ते कधीच डगमगले नाहीत. ते रडणारे नव्हते, तर लढणारे होते; संकटांना संधी मानणारे होते. म्हणूनच त्यांचे व्यक्तिमत्त्व आजही जगभर तेजाने झळकत आहे,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल भोसले यांनी ओघवत्या शैलीत केले, तर आभार प्रदर्शन सुनिल तुपे यांनी मानले. प्रेरणेचा दीप प्रज्वलित करणारा हा सोहळा विद्यार्थ्यांच्या मनावर दीर्घकाळ कोरला गेला.