बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : विश्रांतवाडी परिसरात वैमनस्यातून एका तरुणाचा निर्घृण खून केल्यानंतर आरोपींनी शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरातील वसाहतीत कोयते उगारून दहशत माजवल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

१५ एप्रिल रोजी मध्यरात्री गौरव तेलंगी या तरुणावर कोयत्याने वार करून त्याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तौफिक शेख, राजन दोरास्वामी (दोघे रा. शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळील वसाहत) यांच्यासह त्यांच्या साथीदारांना अटक केली आहे.

खून केल्यानंतर पसार झालेले आरोपी मध्यरात्री पुन्हा शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरातील वसाहतीत शिरले. त्यांच्या हातात कोयते होते. आरोपींनी कोयते उगारून नागरिकांना धमकावत दहशत माजवली. “प्रतिस्पर्धी टोळीतील सराईतांना साथ देऊ नका, तौफिक-राजन टोळीच्या विरोधात गेल्यास जिवे मारू,” अशा धमक्या त्यांनी दिल्या.

यानंतर आरोपींनी वसाहतीतील घरांच्या दरवाज्यांवर कोयते आपटून तोडफोड केली. तसेच नागरिकांना शिवीगाळ करत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले आणि त्यानंतर तेथून पसार झाले.

या प्रकरणी एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, तिच्या तक्रारीनुसार तौफिक शेख, राजन दोरास्वामी व त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाटील या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *