बापुराव चौधरी, उपसंपादक
पुणे : सारसबाग परिसरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात लेखक संपत जाधव यांना शिवीगाळ करत पिस्तुलाचा धाक दाखविल्याची घटना घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत दीपक कुंडलिक कसबे (वय ३५, रा. बिबवेवाडी) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मातंग समाजाच्या आरक्षणासंदर्भात शनिवारी (१८ एप्रिल) रात्री सारसबाग येथील पुतळा परिसरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

रात्री सुमारे दहा वाजता बैठक संपल्यानंतर लेखक संपत गणपत जाधव तेथे थांबले असताना आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. त्या वेळी फिर्यादी कसबे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी कसबे यांनाही शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्यावर हल्ला केला.
फिर्यादीनुसार, आरोपींनी पिस्तुलाचा धाक दाखवून त्याचा दस्ता कसबे यांच्या डोक्यात मारला. तसेच त्यांच्या डोक्यात गोळी झाडण्याची धमकी दिली. जीव वाचविण्यासाठी कसबे तेथून पळून गेले. यावेळी आरोपींनी कसबे आणि इतर कार्यकर्त्यांवर ‘पेपर स्प्रे’ फवारला तसेच लाथाबुक्क्यांनी आणि पट्ट्याने मारहाण केली.
या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक शिरसाठ करत आहेत.