पुणे : वाघोली परिसरात छळाच्या वेगवेगळ्या घटनांमुळे दोन विवाहित महिलांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून, एका प्रकरणात पतीला अटक करण्यात आली आहे.

पहिल्या घटनेत, ३७ वर्षीय संगणक अभियंता महिलेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत महिलेच्या भावाने फिर्याद दिली असून, वाघोली पोलिसांनी पती अभिषेक गुप्ता (वय ३१) याला अटक केली आहे. तसेच सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे उत्तर प्रदेशातील आग्रा येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

फिर्यादीनुसार, आरोपींकडून महिलेवर दहा लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी करण्यात येत होती. मागणी पूर्ण न केल्याने तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या छळाला कंटाळून संबंधित महिलेने वाघोलीतील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे करत आहेत.
दुसऱ्या घटनेत, वाघोलीतील आव्हाळवाडी परिसरात २१ वर्षीय विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पती जयसिंग मधुकर कदम (वय २९) याला अटक करण्यात आली असून, सासूविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, पतीकडून माहेरहून सोन्याची अंगठी आणण्याची मागणी केली जात होती. तसेच मोटारीचे हप्ते भरण्यासाठी पैशांची मागणी करून तरुणीचा छळ म्गत येत होता. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अाळे करत आहेत.