बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : लोणी काळभोर पोलिस ठाण्यात २०११ मध्ये दाखल झालेल्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निकाल देत मुख्य आरोपी महिलेला तीन वर्षांची सक्तमजुरी आणि एक हजार रुपयांचा दंड ठोठावला. या प्रकरणातील इतर पाच आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.

लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३२/२०११ अंतर्गत भारतीय दंड विधान कलम ३०६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा सेशन केस क्रमांक ४८७/२०१३ असा होता. सह जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. ए.आय. पेरमपल्ली, शिवाजीनगर, पुणे यांनी सोमवारी (दि. २१ एप्रिल) हा निकाल दिला.

या प्रकरणात सौ. मंगल सचिन अडागळे, (रा. लोणी काळभोर, तास. हवेली) यांना दोषी ठरवण्यात आले. त्यांना भारतीय दंड विधान कलम ३०६ आणि ३४ अन्वये तीन वर्षांची सक्तमजुरी व एक हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.

तर गुलाब गणपत पवार, प्रकाश गुलाब पवार, अनिल गुलाब पवार, रेखा अनिल पवार, कमलाबाई गुलाब पवार आणि लिला प्रकाश पवार (रा. राहू खेडेकर वस्ती, ता. दौंड, जि. पुणे) यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी केला होता. सध्या ते पुणे शहरातील लष्कर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. या खटल्यात सरकारी पक्षाची बाजू सरकारी अभियोक्ता प्रदीप गेहलोत यांनी मांडली.

या प्रकरणात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये हस्ताक्षर तज्ञांचा अहवाल महत्त्वाचा ठरला. न्यायालयाने या पुराव्याला विशेष महत्त्व देत आरोपीविरोधातील दोषसिद्धी कायम ठेवली.

या खटल्यासाठी लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी विशेष पाठपुरावा केला. तसेच हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार यांचे सहकार्य लाभले.

न्यायालयीन पैरवीसाठी महिला पोलिस हवालदार ललिता कानवडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक विनोद ज्ञानेश्वर कांबळे, महिला पोलिस हवालदार अश्विनी पवार आणि पोलिस शिपाई अशोक शिंदे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *