बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या दारू, हातभट्टीची दारू तसेच गांजाची विक्री करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मालती संतोष मलके (वय ४५, रा. आण्णाभाऊ साठेनगर, वाघमारे वस्ती, पेरणे फाटा, ता. हवेली, जि. पुणे) व मच्छिंद्र शंकर पवार (वय ३८, रा. थेऊर रोड, लोणीकंद, पुणे) अशी तडीपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यांच्यावर लोणीकंद परिसरातील पेरणे फाटा, पेरणे तसेच कटकेवाडी भागात अवैध दारू व गांजा विक्रीचे गुन्हे नोंद आहेत.

मालती मलके हिला एक वर्षासाठी, तर मच्छिंद्र पवार याला दोन वर्षांसाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (अ) व (ब) अन्वये करण्यात आली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिता रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजया वंजारी, पोलीस नाईक गणेश दळवी, पोलीस अंमलदार शुभम सातव व महिला पोलीस शिपाई राजश्री बेलेकर यांनी आरोपींच्या गुन्हेगारी अभिलेखांची तपासणी करून तडीपारीचा प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव पोलिस उपायुक्त परिमंडळ ७ चे सोमय मुंडे यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार त्यांनी तडीपारीचे आदेश दिले.

ही कारवाई अप्पर पोलिस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलिस आयुक्त नुतन पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिता रोकडे व पोलिस निरीक्षक (गुन्हे) स्वाती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

तडीपार करण्यात आलेले आरोपी पुन्हा पुणे जिल्ह्यात आढळल्यास नागरिकांनी लोणीकंद पोलिस ठाण्याशी ९५२७०६९१०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *