बापुराव चौधरी, उपसंपादक
पिंपरी : स्पर्धा परीक्षांची तयारी करताना चालू घडामोडींचे भान ठेवण्यासाठी नियमित वृत्तपत्र वाचन आवश्यक असून अभ्यासाबरोबरच अवांतर वाचनही सातत्याने सुरू ठेवावे, असा सल्ला तेलंगणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. महेश भागवत यांनी दिला. स्पर्धा परीक्षेत अपयश आल्यास पर्यायी ‘प्लॅन बी’ तयार असणे गरजेचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) येथे आयोजित विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे व अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी, पीसीयू नियामक मंडळ सदस्य सचिन इटकर तसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. शितल कुमार रवंदळे आदी उपस्थित होते.
डॉ. भागवत म्हणाले, नागरिकांच्या पोलिसांकडून मोठ्या अपेक्षा असल्या तरी पोलीस यंत्रणेवर कामाचा ताण वाढत आहे. सध्या सुमारे २५ टक्के गुन्हे सायबर क्राईमशी संबंधित असून याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे.
नागरिकांनी ‘पोलीस मित्र’ म्हणून पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

ज्ञानेश्वर लांडगे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, डॉ. भागवत यांनी १९९५ मध्ये दुसऱ्या प्रयत्नात आयपीएस परीक्षा उत्तीर्ण होत देशसेवेत प्रवेश केला. नक्षलवाद्यांचे पुनर्वसन, मानवी तस्करीविरोधातील कारवाई, बालमजुरांची सुटका व शिक्षणाची सोय, तसेच सायबर गुन्ह्यांचा कार्यक्षम तपास अशा विविध क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. संवेदनशील व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख असल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गिरीश देसाई यांनी केले, तर सूत्रसंचालन माधुरी ढमाले यांनी केले. समारोप सत्रात डॉ. भागवत यांनी पीसीईटीच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओला भेट देऊन श्रोत्यांशी संवाद साधला.