बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) तर्फे दि. २२ एप्रिलपासून सुरू करण्यात आलेले बेमुदत उपोषण व धरणे आंदोलन अखेर यशस्वी ठरले असून विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या विद्यापीठ प्रशासनाने मान्य केल्या आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांनी तीव्र उन्हात अन्न-पाणी त्याग करून शांततामय मार्गाने आंदोलन सुरू ठेवले. मात्र, सुरुवातीला प्रशासनाने या आंदोलनाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी विद्यापीठाचा एकही प्रतिनिधी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आला नव्हता. दुसऱ्या दिवशीही कुलसचिव उपस्थित असूनही त्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेणे टाळल्याने प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

परिस्थिती अधिक तीव्र झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सलग तीन तास कडक उन्हात ठिय्या देत उपोषण सुरूच ठेवले. विद्यार्थ्यांच्या ठाम भूमिकेमुळे अखेर प्रशासनाला या आंदोलनाची दखल घ्यावी लागली. या वेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अभय छाजेड यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले. तसेच जांबुवंत मनोहर, प्रवक्ते भाऊसाहेब आजबे आणि सीमा गुट्टे यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला.

या आंदोलनाचे नेतृत्व पुणे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धांत जांभूळकर, महासचिव विकास अवचार आणि विद्यार्थी नेते राहुल गुरधे यांनी केले.
आंदोलनानंतर मान्य करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:

सत्र २०२६-२७ साठी वाढवण्यात आलेली CET शुल्कवाढ तात्काळ रद्द.

“कमवा व शिका” योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचे मानधन वाढवण्याचा निर्णय; याबाबत अंतिम निर्णय दि. २५ एप्रिल रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत होणार.

एक्स्ट्रा क्रेडिट कोर्सेसपैकी बहुसंख्य कोर्सेस ऐच्छिक करण्यास मान्यता; यासंदर्भात लेखी आश्वासन.

या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांच्या एकजुटीसमोर अन्यायकारक निर्णय टिकू शकत नाहीत, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. सुरुवातीला संवाद टाळणाऱ्या प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या संयमी पण ठाम लढ्यामुळे सकारात्मक निर्णय घ्यावा लागला.

दरम्यान, NSUI तर्फे आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी व कार्यकर्त्यांचे तसेच पाठिंबा देणाऱ्या मान्यवरांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. भविष्यात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे अधिक संवेदनशीलतेने पाहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, “दोन दिवस विद्यार्थ्यांनी उपोषण केले तरी प्रशासन जागे झाले नाही, एकही प्रतिनिधी भेटायला आला नाही, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. प्रशासन भावनाशून्य झाल्याचे यातून स्पष्ट होते,” अशी टीका NSUI चे प्रदेश उपाध्यक्ष अक्षय कांबळे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *