बापुराव चौधरी, उपसंपादक
पुणे, : जेजुरीजवळील (ता. पुरंदर) बेलसर टोलनाक्यावर पुरंदर तालुक्यातील स्थानिक नागरिकांना टोलमाफी मिळावी, अशी मागणी पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष उमेश प्रमोद पवार यांनी केली आहे.

याबाबतचे निवेदन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) महासंचालक संजय कदम यांना देण्यात आले.

यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष लहुअण्णा निवंगुणे, पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष साहेबराव फडतरे, प्रदेश युवक सचिव विश्वजीत जाधव, जिल्हा युवक उपाध्यक्ष सुरज कारदगे, जिल्हा युवक सरचिटणीस सुजित शिंदे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

उमेश पवार म्हणाले, “पुरंदर तालुक्यातील नागरिकांवर अन्यायकारक पद्धतीने टोलचा बोजा टाकला जात आहे. स्थानिकांकडून वारंवार टोल वसुली होत असून कोणतीही सवलत दिली जात नाही. ही आर्थिक लूट तात्काळ थांबवून स्थानिकांना संपूर्ण टोलमाफी द्यावी.”
ते पुढे म्हणाले, “प्रशासनाने मागणी मान्य केली नाही, तर युवक काँग्रेसच्या माध्यमातून तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल.
टोलनाक्यावर रास्ता रोको, ठिय्या आंदोलन, मोर्चे काढून लोकशाही मार्गाने लढा उभारला जाईल.”
दरम्यान, सासवडमध्ये ये-जा करणाऱ्या प्रमुख मार्गांवर वाढत्या वाहतुकीमुळे गंभीर समस्या निर्माण होत असल्याने तेथे ओव्हरब्रिज उभारावेत, अशी मागणीही करण्यात आली. तसेच सुकलवाडी व वागदरवाडी फाटा येथे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने पूल बांधावेत आणि जेजुरी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जेजुरी ओव्हरब्रिज लवकरात लवकर उभारावा, अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे.
या सर्व मागण्यांवर अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, “मागण्यांचा गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल,” असे आश्वासन दिले.